कोरोना संकटातच नक्षली कारवायांनाही उत, पत्रके वाटत केले बंदचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

गडचिरोली जिल्ह्यात बुधवार (ता.20) पासून दोन दिवस जिल्हा बंदचे आवाहन केले. यामुळे नक्षलग्रस्त भागात सुरू असलेल्या रस्ते व पूल बांधकामांना ब्रेक लागला. याशिवाय तेंदूपत्ता तसेच वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येते.

गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असतानाच दुसरीकडे नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला अाहे. धानोरा तालुक्‍यात चार वाहनांची जाळपोळ केल्यानंतर गुरुवारी (ता.21) पहाटे नक्षलवाद्यांनी कमलापूर येथील मुख्य चौकात नक्षली बॅनर लावून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या पूर्वी नक्षलवाद्यांनी कमलापूर येथील हत्ती कॅम्प परिसरातील सौंदर्यीकरणाची नासधूस केली होती.
नक्षलवाद्यांनी बंद संदर्भात ठिकठिकाणी टाकलेल्या पत्रकात 22 मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
गडचिरोलीत गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्‍यात पोलिस-नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस दलातील दोन जवान शहीद झाले. त्यानंतर धानोरा तालुक्‍यात नक्षल्यांनी चार वाहनांची जाळपोळ करून रस्त्यावर झाडे तोडून वाहतूक अडविली. नक्षलनेता सृजनक्का चकमकीत ठार झाल्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बुधवार (ता.20) पासून दोन दिवस जिल्हा बंदचे आवाहन केले. यामुळे नक्षलग्रस्त भागात सुरू असलेल्या रस्ते व पूल बांधकामांना ब्रेक लागला. याशिवाय तेंदूपत्ता तसेच वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येते.
सशस्त्र नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्‍यातील कमलापूर येथील मुख्य चौकात बुधवारी रात्री ठिकठिकाणी बॅंनर लावले तर पत्रके टाकून 22 मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा - कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा
नक्षल्यांच्या बंदला नागरिकांचा विरोध
जहाल माओवादी सृजनक्का चकमकीत ठार झाल्याने या घटनेचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात दोन दिवस बंदचे आवाहन केले आहे. याबंदचा अनेक गावात ग्रामस्थांनी विरोध करून निषेध केला. 34 निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी आम्ही बंद का व कशासाठी पाळायचा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. वर्षभरात नक्षलवाद्यांकडून केव्हा आणि कधीही बंद केला जात असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आमचा नक्षलबंदला विरोध असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalites threaten strike in Gadchiroli district