एका डॉक्टरांची हुकलेली संधी दुसऱ्या डॉक्‍टरांना मिळणार

buldana
buldana

खामगाव (जि.बुलडाणा) : महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्‍पावधीतच राजीनामा दिला. फडणवीस सरकार कोसळल्‍याने कही खुशी कही गम अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे शंभर टक्‍के निश्‍चित असलेले कॅबिनेट पदाचे स्‍वप्‍न भंग पावले तर आघाडीच्‍या काळात मंत्री राहिलेल्‍या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. बुलडाण्यातूनच शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांचेही नाव संभाव्य मंत्र्यांमध्ये आहे.


मी पुन्‍हा येईन अशी भिमगर्जना करणारे देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा अजितदादांच्‍या सोबतीने सरकार स्‍थापनेसाठी पुढाकार घेतला. मात्र, अजितदादांचे बंड शमले. त्‍यांनी राजीनामा दिला. त्‍या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांना सुध्दा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस सरकारची दुसरी ईनिंग संपली, हे सरकार कोसळल्‍याने भाजपला मोठा धक्‍का बसला. जिल्ह्यातही याचे पडसाड दिसून येत आहेत. मागील फडणवीस सरकारच्‍या काळात जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांना शेवटच्‍या टप्‍प्‍यात मंत्रिपद मिळाले होते. पुन्‍हा सरकार आल्‍यावर त्‍यांचे मंत्रिपद जवळपास निश्‍चितच होते. विशेष म्‍हणजे निवडणूक निकालानंतर प्रत्‍येक घडामोडीत डॉ. संजय कुटे हे सक्रिय दिसून आले. प्रत्‍येक वेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्‍या ज्‍येष्ठ नेत्‍यांसोबत फ्रेममध्ये दिसले. त्‍यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये डॉ.कुटे यांचे मंत्री पद निश्‍चित होते. परंतु नशीबाने ही संधी त्‍यांना मिळाली नाही. डॉ. कुटे हे अभ्यासू व फडणवीस यांचे खंदे समर्थक म्‍हणून ओळखल्‍या जातात. विजयाचा चौकार मारत मोठे मताधिक्‍क घेवून कुटे निवडून आले होते. परंतु ऐन वेळी युतीत भिनसले आणि डॉ.कुटे यांना मंत्री पदापासून दूर रहावे लागले. आता बुलडाणा जिल्ह्यात ज्‍येष्ठ आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मंत्रिपद मिळणार हे निश्‍चित झाले आहे. त्यासोबतच शिवसेनेच डॉ. संजय रायमुलकर यांनाही राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. शिंगणे, डॉ.कुटे चर्चेत
सत्‍ता स्‍थापनेच्‍या घडामोडीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे नेहमीच चर्चेत राहिले. डॉ. कुटे हे प्रत्‍येक महत्त्‍वाच्‍या घडामोडीमध्ये ज्‍येष्ठ नेत्‍यांसोबत दिसून आले. तर अजित पवारांच्‍या बंडानंतर पहिल्‍यांदा शरद पवारांकडे पोहचून पत्रकार परिषदेत भूमिका मांडणारे डॉ. शिंगणे हेच होते. पवारांनी स्‍वतः डॉ. शिंगणे यांची ज्‍येष्ठ सदस्‍य, माजी मंत्री अशी ओळख पत्रकार परिषदेत दिली होती.

मंत्री पदाची लॉटरी कुणाला
बुलडाणा जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. त्‍यात शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर मेहकर, संजय गायकवाड बुलडाणा, राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा, काँग्रेसचे राजेश एकडे मलकापूर, तर भाजपचे डॉ. संजय कुटे जळगाव जामोद, ॲड. आकाश फुंडकर खामगाव, श्‍वेताताई महाले चिखली यांचा समावेश आहे. महाशिवआघाडीकडून ज्‍येष्ठ सदस्‍य म्‍हणून डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर यांचा विचार होवून शकतो, तर भाजपचे बाहुबली आमदार चैनसुख संचेती यांना पराभूत करून विजयी झालेले काँग्रेसचे एकमेव आमदार एकमेव आमदार राजेश एकडे यांना सुध्दा संधी आहे. तुर्तास तरी मंत्री पदाची लॉटरी डॉ. शिंगणे आणि डॉ. रायमुलकर यांना लागणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com