राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक बांधणार शिवबंधन!

 दिनकर गुल्हाने
शनिवार, 27 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक प्रवेश करणार आहे.

पुसद : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत शिवसेनेला उभारी मिळाली होती, त्याच शिवसेनेत सहा दशकानंतर वसंतराव नाईक यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक प्रवेश करणार आहे.

मुंबई येथे शिवसेना प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर इंद्रनील नाईक आज शनिवारी (ता. 27) पुसद येथे परत येत असून दुपारी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मंगळवार वा बुधवारी  मुंबई येथे 'मातोश्री'वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधतील. त्यानंतर त्यांचे वडील आमदार मनोहर नाईक, ज्येष्ठ पुत्र ययाती नाईक व कुटुंबीयांसोबत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात पुसद विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड राहिला आहे. आमदार मनोहर नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. नाईक घराण्याच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पडणार आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे अकरा वर्ष काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सुधाकराव  नाईक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नाईक घराण्याचे वर्चस्व असलेला पुसदचा गड राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनला. त्यानंतर पाच वेळा आमदार झालेले मनोहर नाईक दहा वर्षे राज्यमंत्रिमंडळात अन्न व औषधी प्रशासन मंत्री बनले. मोदी लाटेच्या पडझडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार मनोहर नाईक यांना 65 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. एकूणच पुसद म्हणजे नाईक घराणे असे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणाने अनुभवले आहे.

केंद्रात मोदी सरकार दुसऱ्यांना तगड्या बहुमताने विराजमान झाल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना ओहटी लागलेली आहे.  नाईक घराण्यातील एड. निलय नाईक यांनी आधीच भाजपात प्रवेश केला व त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांची शरद पवार त्यांच्याशी असलेली जवळीक पाहता ते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडतील, अशी शक्यता कमी होती. मात्र, कनिष्ठ पुत्र इंद्रनील नाईक यांनी राजकीय भवितव्याचा  विचार करीत मागील तीन महिन्यापासूनच राजकीय पर्याय निवडण्याचा विचार केलेला होता. पुसद विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटेला असल्याने  शिवबंधन बांधण्याची त्यांनी तयारी केली. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पुसद विधानसभेत शिवसेनेला सहा हजार मतांची आघाडी मिळाली.  शिवसेनेचे आमदार आणि पुढे राज्यमंत्री याची खात्री असल्याने नाईक घराण्याचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Indranil Naik will be enter in Shivsena