सामाजिक आरक्षणाची गरज कायम - मुख्यमंत्री

सामाजिक आरक्षणाची गरज कायम - मुख्यमंत्री

नागपूर - "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे. त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षणासाठी थोडी वाट बघावी लागेल,' असे स्पष्ट मत मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर्थिक आरक्षणाच्या भूमिकेला छेद दिला. 

वनामतीच्या सभागृहात 16व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि बांधकाम व्यावसायिक आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आरक्षण, हिंदुत्व, संघ यासारख्या अनेक मुद्द्यांवरील प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. सामाजिक आरक्षणाबाबत ते म्हणाले, "प्रत्येकाला संधी हवी आहे. युवा असताना माणूस वाट बघू शकत नाही. आत्ताच हवे आहे आणि इथेच हवे आहे, अशी मानसिकता असते. पण, सगळ्या समाजांना आरक्षण दिल्यावरही नव्वद टक्के लोकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. सरकारमध्ये 25 हजार नोकऱ्या निघतात आणि एवढी मुलं तर एका तालुक्‍यातच असतात. तरुणाई समजते की, आम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे. पण, सरकारी नोकरी हा उपायच राहिलेला नाही. विकासाकडे वाटचाल होत असताना रोजगाराच्या संधी खासगी क्षेत्रातूनच उपलब्ध होत असतात, सरकारमधून नाही. नोकऱ्या मिळण्यात आरक्षणाचा फायदा नाही. आरक्षण हे केवळ न्याय मिळाल्याचे मानसिक समाधान आहे.' 2050 पर्यंत एक नव्हे, तर अनेक मराठी माणसं पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतील, असेही ते एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले. 

"तर मुख्यमंत्रीही झालो नसतो' 
संघाच्या हातांनी संस्कार दिले व समाजासोबत जगायला शिकवले. त्याचाच फायदा राजकारणात काम करताना झाला. संघ नसता, तर मुख्यमंत्रीही झालो नसतो. संघाकडून समाजासाठी काम करण्याचे आणि स्वतःच्या पलीकडे विचार करण्याचे संस्कारही मिळाले, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

"व्यवस्थेतील दुकानदारी'! 
सत्तेत आल्यानंतर आम्ही "व्हिजन डॉक्‍युमेंट' प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी करू शकलो, काही अंतिम टप्प्यात आहेत. पण, सारेकाही वर्ष-दोन वर्षांत होतील, असे वाटले होते. पण, व्यवस्थेकडून तुमच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न होतात. ज्यांची "दुकानदारी' बंद करण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांना होणारा त्रास आपल्याविरुद्ध काम करतो. 50 टक्के लोक प्रचंड क्षमतेचे आणि 50 टक्के लोक फक्त वेळ काढतात. सुरुवातीला या गोष्टीचा मनस्ताप व्हायचा. मात्र, आता प्रशासनावर पकड आली आहे आणि त्रास सहन करण्याची क्षमताही वाढली आहे, या शब्दांत त्यांनी व्यवस्थेविषयी मत मांडले. 

"ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी' 
भारतात पहिल्यांदा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी विकसित करण्याची संधी फक्त महाराष्ट्रालाच आहे. गेल्या वर्षी देशात सर्वाधिक 42 टक्के थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू ही चारही राज्ये एकत्र केली, तरीही महाराष्ट्र आघाडीवर आहे. आर्थिक महासत्ता म्हणून भारत पुढे येईल, त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

"हिंदुत्वात असहिष्णुतेला जागा नाही' 
हिंदुत्वाने विज्ञानाची कास कधीच सोडली नाही. विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात म्हटले होते की, "जगाच्या पाठीवर धर्माच्या आधारावर ज्यांना ज्यांना बहिष्कृत करण्यात आले त्यांना ज्या देशाने सामावून घेतले, मी त्या देशातून आलोय.' हिंदू या शब्दाचा अर्थच सहिष्णुता आहे. ज्या दिवशी हिंदुत्व संकुचित होतं, त्यादिवशी ते हिंदुत्व राहात नाही. ज्या दिवशी ते व्यापक असतं, सहिष्णू असतं, कुठल्याही पूजा व धार्मिक पद्धतीला आपल्यात समाविष्ट करून घेतं, तेच हिंदुत्व आहे. चर्च, मशीद किंवा मजारवर गेल्यानंतर मला माझाच देव दिसतो त्यामुळे मला तिथे जाताना संकुचित वाटत नाही. मात्र, आपली संस्कृती, विचार, भारतीय जीवनपद्धती नाकारण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे आपले हिंदुत्व जागृत करावे लागते आणि त्या हिंदुत्वाचा मला अभिमान आहे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com