कोरोना संकटात नवे "बिझनेस मॉडेल'

jumbo-hospital
jumbo-hospital

चंद्रपूर : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना टाळे लागले. मात्र, नागपूर आणि चंद्रपुरातील काही व्यापाऱ्यांनी राजकीय नेते आणि मनपातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोरोनाच्या संकटात संधी शोधत नवे "बिझनेस मॉडेल' उभे केले. त्यातूनच चंद्रपूर शहरात राज्यातील पहिले खासगी जम्बो कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. सातशे खाटांच्या या सेंटरमध्ये दररोज साठ ते सत्तर लाखांची उलाढाल अपेक्षित आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपुरात चारशे खाटांचे कोविड केअर सेंटर उभे राहील, अशी घोषणा केली होती. त्यांच्या कार्यकाळात ते पूर्ण होऊ शकले नाही. नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुन्हा चंद्रपुरकरांना चारशे खाटांच्या कोविड सेंटरचे स्वप्न दाखविले आहे. तत्पूर्वीच शहरात सातशे खाटांचे खासगी कोविड केअर सेंटर नागपूर मार्गावरील शंकुतला लॉन येथे उद्‌घाटनासाठी तयार आहे. चंद्रपुरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुप वासाडे यांनी यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे. डॉ. वासाडे फक्त चेहरा आहे. नागपुरातील आणि चंद्रपुरातील व्यापारी, जिल्ह्यातील एक बडा राजकीय नेता आणि मनपातील एका अधिकाऱ्यांची यात गुंतवणूक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला. महिन्याअखेर बाधित रुग्णांचा आकडा वीस हजारांच्या घरात जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, याकाळात बैठका आणि घोषणांव्यतिरिक्त काहीच झाले नाही. आता स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पुन्हा आठवडाभरात "जनता कर्फ्यू"चा खेळ केला जात आहे.

दरम्यान, आजही कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. मनुष्यबळाच्या अभावामुळे मृत्यूची संख्या वाढते आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. खासगी डॉक्‍टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास तयार नाही, असे प्रशासन सांगत आहे. आता त्यातीलच काही खासगी डॉक्‍टर या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यास उत्सुक आहे. खासगी जम्बो कोविड सेंटरला जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च आहे.

शासनाने निर्धारित केलेले दरच आकारले जातील. या दरानुसार सातशे खाटांचा (अतिदक्षता विभाग पकडून) दररोजचा हिशेब साठ ते सत्तर लाख रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे व्यापारी, अधिकारी आणि नेते या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी तयार झाले, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात शहरातील एनडी हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी बैठकांचे सत्र पार पडले. या खासगी कोविड सेंटरमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. परंतु, याचा लाभ गरिबांना मिळणार नाही. खाटेच्या प्रतीक्षेत त्यांचा जीव टांगणीलाच लागून राहणार आहे.


श्रीमंत तिकडे, गरीब इकडे
खासगी जम्बो कोविड सेंटरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले. श्रीमंत लोक तिथे उपचारासाठी गेले, तर शासकीय रुग्णालयातील बेड खाली होतील. ते गरिबांना मिळतील, असे त्यांनी जनता कर्फ्यूसंदर्भात आज नियोजन भवनात आयोजित बैठकीत सांगितले. मात्र, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या खासगी कोविड केअर सेंटरमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्याच्या मागणीवर ते बोलले नाही.
 
प्रशासनाचे अपयश लपविण्याचा प्रयत्न
खासदार बाळू धानोरकर यांनी खासगी जम्बो कोविड केअर सेंटर म्हणजे प्रशासनाच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप "सकाळ'शी बोलताना केला. यामुळे काही जणांचा फायदा होईल. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांना सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचाच आधार आहे. राज्यातील कोणत्याच महानगरपालिका क्षेत्रात असे खासगी जम्बो कोविड सेंटर उभे राहिले नाही. मग चंद्रपुरातच का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

घातक पायंडा
राज्यातील अनेक महानगरपालिकांनी राज्य शासनाच्या मदतीने स्वत:चे जम्बो कोविड केअर सेंटर उभे केले. ते चंद्रपुरात का होऊ शकत नाही. नागरिकांचे आरोग्य व्यापाऱ्यांच्या हातात देणे अत्यंत घातक आहे. महिन्याअखेर वीस हजारापर्यंत रुग्णांचा आकडा जाईल, असे प्रशासन स्वत: सांगत आहे. मग प्रशासन हात बांधून का बसले आहे. आरोग्याचा हक्क संविधानिक आहे. त्यात आरक्षणाचा प्रश्‍नच येत नाही.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com