भाजपचे मंडळाध्यक्ष बदलणार? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मंडळात एका अध्यक्षाची नेमणूक केली जाते. नागपूर शहरात भाजपचे सहा आमदार होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र दोन जागा भाजपने गमावल्या आहेत.

नागपूर : भाजपची संघटनात्मक निवडणूक जाहीर असल्याने आता शहराच्या कार्यकारिणीच्या बदलाकडेही सर्वांची लक्ष लागले आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना अद्याप नवी कार्यकारिणी तयार करण्याची संधी मिळाली नसून, विधानसभेचा निकाल बघता काही मंडळाध्यक्षांनाही डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. 

शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मंडळात एका अध्यक्षाची नेमणूक केली जाते. नागपूर शहरात भाजपचे सहा आमदार होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र दोन जागा भाजपने गमावल्या आहेत. उत्तर नागपूरमध्ये माजी आमदार डॉ. मिलिंद माने तर पश्‍चिमचे माजी आमदार सुधाकर देशमुख यांचा पराभव झाला. त्यांना अनुक्रमे कॉंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांनी पराभूत केले. इतरही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्‍य मोठ्या प्रमाणात घटले आहे.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि दक्षिण-पश्‍चिममधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुमारे एक लाखाच्या मताधिक्‍याची अपेक्षा होती. फडणवीस यांचे निम्म्यावर तर खोपडे यांचे मताधिक्‍य त्याहीपेक्षा कमी झाले. दक्षिणमध्ये मोहन मते आणि पश्‍चिममध्ये सुधाकर देशमुख यांना अटीतटीचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेतही मताधिक्‍यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

त्यामुळे यावरही चिंतन केले जावे. कोणी काम केले, कोणी पाट्या टाकल्या, कोण पक्षापेक्षा नेत्याला चिटकून राहिले, विरोधात काम केले याची समीक्षा केली जावी, याची मागणी भाजपमध्ये दबक्‍या आवाजात केली जात आहे. खरोखरच वस्तुस्थिती समोर आणायची असेल तर संपूर्ण कार्यकारिणी आणि मंडळाध्यक्षांसह कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी केली जात आहे. 

 

काही मंडळाध्यक्षांवर कार्यकर्ते नाराज 

सध्या मंडळाध्यक्ष म्हणून संजय ठाकरे- दक्षिण, दिलीप गौर- उत्तर, महेंद्र राऊत- पूर्व, पश्‍चिम- किसन गावंडे, दक्षिण- पश्‍चिम रमेश भंडारी, मध्य- बंडू राऊत कार्यरत आहेत. दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरमध्ये भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. काही मंडळाध्यक्षांवर कार्यकर्ते नाराज आहेत. फक्त नेत्याचे स्वीय सहायक म्हणून मंडळाध्यक्ष काम करीत असल्याचा काहींवर आरोप आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष प्रवीण दटके काय बदल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about nagpur bjp