esakal | प्रेरणादायक! अखेर निर्मलाला मिळाला हक्‍काचा निवारा; हेल्पिंग हॅण्ड्‌सने बांधले नवीन घर
sakal

बोलून बातमी शोधा

अहेरी : संस्थेने निर्मलासाठी बांधलेले घर.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिला मानसिक आजाराने ग्रासले. हा आजार तिच्या घराण्यात आनुवंशिक असल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला फारसा त्रास नसल्याने तिच्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर ती गायब झाली. पण, काही वर्षांनी गावात दिसली ती वेडसर अवस्थेतच. मध्यंतरी तिचा विवाह एका मुक्‍या व्यक्तीशी लावून देण्यात आला होता.

प्रेरणादायक! अखेर निर्मलाला मिळाला हक्‍काचा निवारा; हेल्पिंग हॅण्ड्‌सने बांधले नवीन घर

sakal_logo
By
संतोष मद्दीवार

अहेरी (जि. गडचिरोली) : बालपणी एक हुशार, चुणचुणीत विद्यार्थिनी असलेल्या निर्मलाला अचानक आनुवंशिकरीत्या चालत आलेल्या मानसिक विकाराने घेरले आणि तिचे आयुष्य भरकटत गेले. मानसिक संतुलन बिघडल्याने एका मुक्‍या व्यक्तीसोबत घरच्यांनी तिचा विवाह लावून दिला. त्यानेही सोडून दिल्यावर वेडसरपणाच्या आवर्तनात सापडलेली निर्मला आपल्या लहानशा बाळासह रस्त्यावर भटकू लागली. पण, हेल्पिंग हॅण्ड संस्था व तिच्या वर्गमित्र, मैत्रिणींनी पुढाकार घेत एक छोटेसे घर तिला बांधून दिले. त्यामुळे निर्मला दुर्गे व तिच्या बाळाला हक्‍काचा निवारा मिळाला आहे.

कुणाच्याही डोळ्यांत टचकन पाणी येईल, अशी निर्मला दुर्गेची करुण कहाणी आहे. वर्गातील शांत, आज्ञाकारी व हुशार मुलगी, अशी तिची ओळख होती. हलाखीची परिस्थिती असूनही तिने शिक्षणाची कास सोडली नाही. सर्व मुलांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयात ती निपुण होती. शिक्षणाची ओढ व अभ्यासाची जिद्द हीच तिची ओळख होती. दहावीत संपूर्ण शाळेतून मुलींमधुन ती पहिली आली. पुढे तिच्या क्षमतेनुसार विज्ञान विषयात प्रवेश घेतला. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिला मानसिक आजाराने ग्रासले. हा आजार तिच्या घराण्यात आनुवंशिक असल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला फारसा त्रास नसल्याने तिच्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर ती गायब झाली. पण, काही वर्षांनी गावात दिसली ती वेडसर अवस्थेतच. मध्यंतरी तिचा विवाह एका मुक्‍या व्यक्तीशी लावून देण्यात आला होता. त्याच्यापासून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण, या छोट्या बाळाला घेऊन फिरणारी निर्मला अशा विपन्नावस्थेत दिसेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती.

अवश्य वाचा : आमटे परिवाराने फेटाळले करजगींचे आरोप; कौस्तुभ आमटे महारोगी सेवा समितीच्या विश्‍वस्त मंडळावर

अन् मुलगा बोलू लागला

बाळ थोडे मोठे झाल्यावर काहींनी त्याला शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा विरोध होता. ते बाळच निर्मलाचा आधार आणि जगण्याचे कारण राहिले होते. परंतु बाळाला बोलणे शिकविणारे कोणीच नव्हते. आईचे बोट पकडून तोसुद्धा मुकाट्याने फिरायचा. निर्मलाला तशा अवस्थेत तिच्या वर्गमित्र/मैत्रीणींना पाहावत नव्हतं. फारतर अन्नधान्य व कपडे देण्याशिवाय त्यांना काहीच करता येत नव्हते. तिच्या आजारामुळे दिलेल्या वस्तू फार काळ टिकतही नव्हत्या. हळूहळू तिचा मुलगा मोठा झाला. आजूबाच्यांना बघून स्वतःहून बोलणे शिकला आणि परिस्थिती किंचित बदलायला सुरुवात झाली. मात्र, त्यांना राहण्याची सोय नव्हती. जनावरांच्या गोठ्यासारख्या जीर्ण झोपडीत हे मायलेक राहात होते.

निर्मलाला नवीन घर सुपूर्द

निर्मलाच्या मुलाने तिच्या वर्गमित्रांसमोर ही व्यथा मांडली. सर्व मित्र-मैत्रीणींनी मदत करायची तयारी दर्शवली. हेल्पिंग हॅण्ड्‌स ही संस्था बऱ्याच वर्षांपासून निर्मलाला छोटी-मोठी मदत करत आहे, हे त्यांना कळले. हेल्पिंग हॅण्ड्‌सच्या एका हाकेत अपेक्षित रक्कम जमा झाली आणि सर्वांच्या मदतीने बघता बघता घराचे कामही पूर्ण झाले. दिवाळीच्या शुभपर्वावर कोरोनाचे नियम पाळत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून निर्मलाला तिचे नवीन घर सुपूर्द करण्यात आले.

जाणून घ्या : गडचिरोलीत तलावांच्या बाजूला मटण मार्केट; अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण  

आनंदले मायलेक

सीआरपीएफच्या 37 बटालियन अहेरीचे कमांडंट श्रीराम मीना, रामरस मीना, डॉ. आय. एच. हकीम व वर्गमित्र प्रतिनिधी प्रभाकर श्रीरामवार यांच्या हस्ते निर्मलाच्या नव्या घराचे उद्‌घाटन करण्यात आले. निर्मला व तिचा मुलगा बालाजी यांचा नवीन घरात प्रवेश होताच मायलेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. यावेळी हेल्पिंग हॅण्ड्‌सचे कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर, संतोष मद्दीवार, नितीन दोंतुलवार, शंकर मगडीवार, शैलेंद्र पटवर्धन, पूर्वा दोंतुलवार, विवेक बेझलवार, ईस्ताक शेख, वर्गमित्र डॉ. मनीष दोंतुलवार, रमेश चुक्कावार, अनिल चिलवेलवार आदींची उपस्थिती होती.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image