नितीन गडकरीं म्हणतात, सध्याचा मौसम तिकीट मागणाऱ्यांचाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर  : सध्याचा मोसम तिकीट मागणाऱ्यांचा आहे. जो भेटायला येतो, तो तिकीटच मागतो. सत्यपाल महाराजांना खासदार व्हायचे नाही. आमदार, सरपंच, ग्रामसेवकही व्हायचे नाही. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत समाजप्रबोधन करावे, देवाने त्यांची प्रकृती उत्तम ठेवावी इतकीच प्रार्थना करतो, असे मागणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागितले.

नागपूर  : सध्याचा मोसम तिकीट मागणाऱ्यांचा आहे. जो भेटायला येतो, तो तिकीटच मागतो. सत्यपाल महाराजांना खासदार व्हायचे नाही. आमदार, सरपंच, ग्रामसेवकही व्हायचे नाही. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत समाजप्रबोधन करावे, देवाने त्यांची प्रकृती उत्तम ठेवावी इतकीच प्रार्थना करतो, असे मागणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागितले.
मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध खंजिरीवादक सत्यपाल महाराजांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी खासदार अजय संचेती अध्यक्षस्थानी उपस्थित होते. मंचावर सत्यनारायण नुवाल, डॉ. गिरीश गांधी, प्रवीण तापडिया, पूनमचंद मालू, अतुल कोटेचा, सुधीर बाहेती यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी सामाजिक परिवर्तनातील गती तपासण्याची गरज असल्याचे सांगितले. भारतात नेतृत्व करणारे आदर्श समाजप्रबोधनातून प्रेरणा घेऊन तयार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुरस्कारमूर्तीचा शोध घेणे महाकठीण असते. हा प्रकार ढिगाऱ्यातून मोती शोधून काढण्यासारखा आहे. इतकेच नव्हे तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणारा त्याच दर्जाचा असावा लागतो. सत्यपाल महाराजांचा साधेपणा मला प्रचंड भावला. त्यांचे कपडे, राहणे, बोलणे सगळेच साधेपणाचे आहे. संत गाडगेबाबा अन्‌ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार त्यांनी विदर्भाच्या मातीत पोहचवले. विदर्भात स्वातंत्र्यलढ्याची मशाल तेवत ठेवण्यात याच खंजिरीचा मोलाचा वाटा असल्याचे मत बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्‍त केले. खंजिरी मानवी जगण्यातले सार सांगते. ते ज्यास कळले तो ऐशोआराम सोडून साधेपणाचे जगणे स्वीकारतो, असेही पुरोहित म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी नितीन गडकरी यांनी सत्यपाल महाराजांच्या कार्यासाठी शीतपेटी भेट देण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. आभार सुधीर बाहेती यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari says, the current season is for those seeking tickets