चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन राठोड हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

हुतात्मा नितीन शिवाजी राठोड यांच्या मागे पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन राठोड (वय 10), मुलगी जीविका राठोड (वय 5), वडील शिवाजी रामू राठोड, आई सावित्रीबाई शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण शिवाजी राठोड, दोन बहिणी गीता आणि योगिता असा असा परिवार आहे.

सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले.

प्राप्त माहितीनुसार, नितीन शिवाजी राठोड केंद्रीय राखीव पोलिस दलात 2006 साली भरती झाले. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. काही दिवसांपूर्वी 50 दिवसांची सुट्टी आटोपून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आपल्या बटालियन तीनमध्ये जम्मू येथे रुजू झाले होते. तेथूनच सर्व बटालियन जम्मू येथून श्रीनगर राष्ट्रीय मार्गाने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 70 वाहनांचा ताफा जात असताना त्या वाहनात नितीन राठोड होते. त्याच वाहनावर स्फोटकांनी भरलेली चार चाकी वाहन धडकून सैन्याची बस वाहन स्फोटकांनी उडवून दिली. शक्तिशाली स्फोटात सदर बस उद्ध्वस्त झाली. यामध्ये जवान नितीन राठोड यांना वीर मरण आले.

हुतात्मा नितीन शिवाजी राठोड यांच्या मागे पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन राठोड (वय 10), मुलगी जीविका राठोड (वय 5), वडील शिवाजी रामू राठोड, आई सावित्रीबाई शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण शिवाजी राठोड, दोन बहिणी गीता आणि योगिता असा असा परिवार आहे.

हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या वीर मरणाची बातमी येताच प्रशासनाच्या वतीने लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण, जि. प. सदस्य राजू इंगळे, सरपंच संजय चव्हाण, शिक्षक सुरेश चव्हाण यांनी अंतिम संस्कारासाठी स्थळाची पाहणी केली आहे. यावेळी हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या स्मारक बनवण्याचा गावकर्‍यांचा संकल्प आहे. 

गावातील 30 जवान देशसेवेत रुजू: 
चोरपांग्रा गोवर्धन नगर हे 800 लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावातील 30 जवान सध्या देशसेवेत रुजू आहेत. या गावात बाल वयापासून देशभक्ती ओतपोत भरली असून सध्याही येथील युवक देशभक्तीसाठी आपले जीवन समर्पित करणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.

Web Title: Nitin Rathod martyr of Chorpangra Govardhan Nagar