Maharashtra Vidhansabha 2019 : अमरावतीत कॅडरबेस हत्तीची चाल मंदावली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या हत्तीची चाल यंदा मात्र मंदावली आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत जोर मारणाऱ्या बसपने यंदा कमालीची ढिलाई बाळगल्याने कॅडरबेस बसपकडे बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बडनेरा, मेळघाट, धामणगावरेल्वे या मतदारसंघांत या पक्षाची शक्ती चांगली आहे.

विचारधारेवर चालणाऱ्या बहुजन समाज पक्षाने प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघात शक्ती दाखवून दिली आहे. धामणगावरेल्वे मतदारसंघात 2004 व 2009 मध्ये या पक्षाच्या उमेदवाराने 29 हजारांवर मते घेतली. तर मेळघाट या आदिवासीबहुल मतदारसंघात गेल्या निवडणुकीत 48 हजार 529 मतांपर्यंत मजल मारली होती. बडनेरा, अचलपूर, तिवसा व मोर्शी या मतदारसंघांमध्ये बसपच्या उमेदवारामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला आहे.
सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवू शकला नसला तरी मतविभाजनात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बसपने यंदा प्रत्येक मतदारसंघातून तीन नावे बोलावली होती. उमेदवारी दाखल करण्यास दोनच दिवस शिल्लक असताना त्यांची यादी अद्याप निश्‍चित होऊ शकली नाही. आठही मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे पश्‍चिम विदर्भाचे संघटक नगरसेवक ऋषी खत्री यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवार रिंगणात येणार असले तरी तो जोष मात्र दिसत नसल्याने बसपसंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. गतवेळी ज्यांनी या पक्षाकडून निवडणुका लढल्या त्यातील बहुतांश पक्ष सोडून इतर पक्षांच्या तंबूत दाखल झाले आहेत. त्यामुळे निर्णायक मते मिळवू शकणाऱ्या उमेदवारांच्या नावांवर विचार सुरू असल्याचे व त्यांची नावे लवकरच जाहीर होतील, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. असे असले तरी दमदार चाल करणाऱ्या हत्तीची या वेळी मात्र गती मंदावल्याचे दिसून येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no activities of bsp in amravati