यंदा तोरणे-पताका लागणार नाहीत, तान्हा पोळा फुटणार नाही! वाचा काय आहे कारण

मिलिंद उमरे
Tuesday, 18 August 2020

खरेतर हा एक दिवसाचा सण असतो. पण, लहान मुले वर्षभर या सणाची वाट बघतात. यानिमित्त नंदी तयार करणारे, त्यासाठी सजावटीचे साहित्य विकणारे, अशा अनेकांना रोजगार मिळतो. पण, यंदा अनेकांचा हा रोजगार व बालकांचा आनंद कोरोनामुळे हिरावला गेला आहे.

गडचिरोली : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बळीराजाचा आवडता सण बैलपोळा. त्याच्या दुसऱ्या दिवशी बच्चेकंपनीसाठी तान्हा पोळा हा खास सण असतो. पण, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास प्रतिबंध घातल्याने बालकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा बालकांना हा सण घरीच साजरा करावा लागणार असून त्यांचे सुंदर सजवलेले लाकडी नंदीबैल बुधवारी (ता. १९) घरातच राहतील.

कृषिप्रधान भारत देशात शेतात राबणाऱ्या बैलांना विशेष सन्मान आहे. त्यामुळेच दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा साजरा होतो. यानिमित्त शेतकरी बैलांना न्हाऊमाखू घालून गोड घास भरवत त्याची पूजा करतात. गावातून मिरवणूक काढतात. बालकांचा स्वभाव मोठ्यांचे अनुकरण करण्याचा असल्यामुळे कदाचित या सणाचे अनुकरण करीत बालकांनी लाकडी नंदीबैल सजविणे सुरू केले असावे. म्हणूनच त्यांच्या समाधानासाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पाडव्याला बालकांसाठी तान्हा पोळा साजरा होतो.

या दिवशी बालके आपले लाकडी किंवा मातीचे सुबक नंदीबैल स्वच्छ करून त्यांना फुलांच्या माळा, रंगीत चित्रे व इतर साहित्यांनी सजवतात. त्याला फुगे व रंगीत झिरमिळ्या बांधतात. मग, आपले सजवलेले नंदी घेऊन परिसरात फिरतात. परिसरातील नागरिक त्यांचे कौतुक करीत त्यांना पैसेही देतात. यालाच बोजारा म्हणतात. दरवर्षी बालकांसाठी हा सण आनंद घेऊन यायचा. यानिमित्त बालकांना आपल्या सवंगड्यांसोबत आनंदाने फिरता यायचे. नंदीच्या सजावटीत त्यांच्यातील क्रियाशीलता, सृजनशक्तीचा विकास व्हायचा. अनेकजण एकत्र येऊन नंदी सजवत असल्यामुळे समूह भावना वाढीस लागायची. पण, सध्या कोरोनामुळे समूह किंवा एकत्रीकरण हा शब्दसुद्धा टाळण्यात येत आहे. त्यामुळे बालकांना आपला नंदी घेऊन घरातच बसावे लागणार आहे.

खरेतर हा एक दिवसाचा सण असतो. पण, लहान मुले वर्षभर या सणाची वाट बघतात. यानिमित्त नंदी तयार करणारे, त्यासाठी सजावटीचे साहित्य विकणारे, अशा अनेकांना रोजगार मिळतो. पण, यंदा अनेकांचा हा रोजगार व बालकांचा आनंद कोरोनामुळे हिरावला गेला आहे.

सविस्तर वाचा - सतर्क रहा! सप्टेंबर महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर.. या मंत्र्यांनी केले जनतेला आवाहन.. वाचा सविस्तर

स्पर्धासुद्धा नाहीत...
तान्हापोळ्यानिमित्त बालकांच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून अनेक मंडळे, संस्था, संघटना नंदी सजावट स्पर्धांचे आयोजन करतात. शाळांमधूनही अशा स्पर्धांचे आयोजन असते. त्यामुळे बालके अधिक हिरिरीने सहभागी होत आपला नंदी सजवतात. शिवाय विविध प्रकारच्या वेशभूषाही करतात. पण, यंदा या स्पर्धांवरसुद्धा कोरोनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No celebration of Tanha Pola this year due to corona