Video : दुधाळ्यातील दूध-दह्याला केव्हा मिळणार गिऱ्हाईक?

श्रीकांत पेशट्टीवार
शनिवार, 11 जुलै 2020

दुधाळा गावाच्या नावाप्रमाणेच येथील मुख्य व्यवसाय दूध-दहीची निर्यात हाच आहे. गावातील 85 टक्के कुटुंबाकडे दूधाळ जनावरे आहेत. गावात जवळपास दरदिवशी 500-600 लिटर दूध जमा होते. दहीही मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील " दुधाळा " गावावर टाळेबंदीत संकट कोसळले आहे. गावाच्या नावाप्रमाणेच दुधाळ्यातील दूध, दही प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहरातील हॉटेल्समध्ये आणि घराघरांत दुधाळ्याचे दूध-दही पोहोचते. गावाचा हाच मुख्य व्यवसाय. गावातून दर दिवशी 500-600 लिटर दुधासोबतच दही निर्यात केले जाते. टाळेबंदीत मात्र गाव आर्थिक संकटात सापडले. शहरात दही-दूध नेण्यासाठी साधने उपलब्ध नाहीत संचारबंदीचे नियम दुध, दही व्यवसायाला मारक ठरल आहेत. संचारबंदीच्या काळात नाल्यात दूध-दही फेकून देण्याची वेळ गावांतील दूध विक्रेत्यांवर ओढावली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनला लागून असलेले दूधाळा हे लहानसे खेडेगाव. गावाची लोकसंख्या जेमतेम सहाशे. 421 मतदार असलेल्या या गावात आदिवासी, ओबीसीबांधवांची वस्ती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या गावातील घरोघरी दूध काढले जाते. दुधाळा गावाच्या नावाप्रमाणेच येथील मुख्य व्यवसाय दूध-दहीची निर्यात हाच आहे. गावातील 85 टक्के कुटुंबाकडे दूधाळ जनावरे आहेत. गावात जवळपास दरदिवशी 500-600 लिटर दूध जमा होते. दहीही मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. दर दिवशी पहाटेला मिळेल त्या वाहनाने, बसने दूध-दही चंद्रपूर शहरातील हॉटेल्स आणि घराघरांत पोहोचविण्याचे काम या भागातील महिला, युवक कित्येक वर्षांपासून करतात. या व्यवसायातून दर महिन्याला जवळपास तीन ते चार लाखापर्यंतचे उत्पन्न होत असते.

दरम्यान, मार्च महिन्यांत देशावर कोरोना विषाणूचे संकट कोसळले. देश टाळेबंद झाला. टाळेबंदीत उद्योग, लघु व्यवसायाला मोठा फटका बसला. यातून दूधाळा गावातील दुग्ध व्यवसायही सुटला नाही. टाळेबंदीतही दुधाळा गावात दूध काढले जायचे. दही आणि इतर दुग्ध पदार्थ बनविले जायचे. मात्र, दूध-दही शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनेच उपलब्ध नव्हती. त्यामुळे युवक, महिला आपल्या वाहनाने चंद्रपूर गाठायचे. मात्र, कोरोना संक्रमणाच्या काळात दूध, दहीही विकत घेण्यास नागरिक मागेपुढे बघायचे. त्यामुळे अनेकदा दूध-दही नाल्यात फेकून देण्याची वेळ गावांतील या व्यवसायांवर ओढावली होती.

दूध-दही विक्रीतून हातात आलेल्या पैशावरच गावातील कुटुंबाचा उदनिर्वाह चालतो. मात्र, हा व्यवसाय ठप्प पडल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले. साधारणतः दोन महिने गावातील दूध-दही विक्री बंद होती. या दोन महिन्यांच्या काळात गावावर आर्थिक मंदीचे सावट गडद होते.

 

आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात गावातील दूध-दही शहरात पोहोचविले जाते. मात्र, त्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या बससेवा बंद आहे. त्यामुळे गावातील ऑटोने महिला चंद्रपूर शहरात दूध, दही विकण्यास घेऊन जातात. दूध, दही विकल्यावर याच ऑटोने परत गावाकडे परतात. यातून थोडीफार आवक सुरू झाली आहे. दुधाळ्यातील दूध-दह्याचा व्यवसाय अद्यापही पूर्वपदावर आला नाही. कोरोना संपुष्टात येऊन आपला व्यवसाय पूर्वपदावर येवो, अशी या गावातील दुग्ध विक्रेत्यांची इच्छा आहे.

वायगावचे झाले दुधाळा
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफरझोनमध्ये असलेल्या या गावाचे पूर्वीचे नाव वायगाव होते. गावातील अनेकांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर या भागात नेहमीच असतो. यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून गावातील अनेकांनी गायी, म्हशी विकत घेतल्या. त्यातून दूध, दही विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. गावातील प्रत्येकाच्या घरी दुभती जनावरे आहेत. दूध विक्रीचे प्रमाण दिवसोंदिवस वाढते आहे. त्यामुळे नंतर या गावाचे नाव दुधाळा असे पडले.

सविस्तर वाचा - मोठी बातमी : महापौर जोशींवरील गोळीबार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

थोडाफार पूर्वपदावर
गावाचे अर्थकारणच दुध, दह्यावर निर्भर आहे. लॉकडाउन काळात गावातील दूध विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर हा व्यवसाय थोडाफार पूर्वपदावर आला आहे. मात्र, पूर्वीसारखा सुरू होण्यास अद्याप वेळ लागेल.
उमाजी सुरतीकर, सरपंच दूधाळा ग्रामपंचायत.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No custmer for milk in Dudhala