कधी आजारपण तर कधी नक्षली हल्ला...स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही समस्या यांच्या पाचवीलाच पुजलेल्या!

gadchiroli
gadchiroli

गडचिरोली : बघता बघता देशाच्या स्वातंत्र्याची सात दशके उलटली शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभरात जल्लोषात साजरा होईल. पण, देशाला स्वातंत्र्य मिळाले, तरी आम्हाला भय, भूक, गरिबी, कुपोषण, निरक्षरता, असुरक्षितेसारख्या समस्यांपासून स्वातंत्र्य कधी मिळणार हा गडचिरोली जिल्हावासींचा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

वनसमृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा अतिमागास, नक्षलग्रस्त आणि गरीब जिल्हा म्हणून अधिक ओळखला जातो. साधारण ४० वर्षांपासून नक्षलवाद्यांची हिंसा, कौर्य आणि भयाची जखम घेऊन वावरणारा हा जिल्हा देशातील इतर जिल्ह्याच्या समकक्षही येऊ शकला नाही. उद्योगविहीन असलेल्या या जिल्ह्यात गरीबीसोबत बेरोजगारी पाचवीलाच पुजलेली आहे. दळणवळणाच्या साध्या सुविधाही अनेक भागांत नाही.

भारताने मंगळावर यान पाठविले. पण, इथल्या अनेक दुर्गम गावांत साधी रुग्णवाहिका पाठवता आली नाही. म्हणून आजही दुर्गम भागांत आजारी, अपघातग्रस्त, गर्भवती महिलांना खाटेची कावड करून रुग्णालय गाठण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येते. भामरागड तालुक्‍यातील गुंडेनुर गावातील जया रवी पोडाळी या चार महिन्यांच्या गर्भवती महिलेला वाहन न मिळाल्याने असे खाटेवर आणण्यात आले. पण, तिचा मृत्यू झाला. अशा अनेकांनी सुविधांअभावी आपले जीव गमावले आहेत. शिवाय त्यांच्या पोटातले जीव हे जग पाहण्यापूर्वीच जग सोडून गेले. तसे ते जन्माला आले असते, तरी बालपणीच कुपोषण, नंतरचे आजारपण, तारुण्यात बेरोजगारी, अशा अनेक संकटांचा सामना करीत अखेर खंगत मरूनच गेले असते.

आधीच असुविधा असताना येथे नक्षलवाद्यांचे हिंसेचे तांडव थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला याच भामगराड तालुक्‍यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत किराणा साहित्य आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात दुशांत नंदेश्‍वर हा जवान शहीद तर दिनेश भोसले हा जवान जखमी झाला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना अनेक ठिकाणी नामोहरम केले असले, तरी चवताळलेले नक्षलवादी दबा धरून बसतात आणि असे जीव घेतात. कधी हा जीव पोलिस जवानाचा असतो, तर पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप लावलेल्या सामान्य नागरिकाचा.

सरकारनेही कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाची टूम काढताना इथल्या किती विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत, याचा साधा विचारही केला नाही. जिथे चूल पेटवायला केरोसीन मिळत नाही, तिथे ज्ञानाची ज्योत पेटवायला इंटरनेट सुविधा आणि महागडे मोबाईल कुठून येतील. तालुकास्थळापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या झारेगुडासारख्या गावातील नागरिकांना नदीतून नावेने प्रवास करत तालुका गाठावा लागतो, सिरोंचाकडे जाताना ठेंगणे पूल कधी पाण्याखाली जातील, याची शाश्‍वती नसते, इतरही तालुक्‍यात अशा समस्या आहेतच.

खरेतर या जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचला, तर हनुमानाच्या शेपटीसारखा लांबतच जाईल. सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सुरू असताना समस्याग्रस्त जिल्हावासींच्या दु:खाचे भान सरकारला राहील का, हाच खरा प्रश्‍न आहे.

"आबां'ची येते आठवण...
या जिल्ह्याचे पालकत्व स्वत:हून मागून घेणारे आर. आर. पाटील उपाख्य आबा यांचे स्मरण जिल्हावासींना या विशेष दिवशी विशेषत्वाने होते. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीच असावा, असे नाही, तर त्याला विकासाची तळमळ असावी, हे त्यांनी दाखवून दिले. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात दुचाकीवरून निर्भयपणे फिरणाऱ्या आबांनी गोदावरी नदीवरचा भव्य पूल, कृषी महाविद्यालयाची निर्मिती अशी अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली. सध्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कित्ता गिरवावा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com