डोंगरकपारीत हरविला "घोडनकप्पीच्या" विकासाचा सूर्य

ghodankappi
ghodankappi

(जि. चंद्रपूर) गडचांदूर :  निजामकालीन वस्ती असलेल्या जिवती तालुक्यातील "घोडनकप्पी" हे कोलाम,आदिवासींचे गाव स्वातंत्र्याला सात दशके उलटल्यानंतरही विकासाची वाट पाहत आहे. डोंगरांनी चारही बाजूनी वेढलेल्या या कोलाम गुड्यात शासनाच्या योजनांची किरणे अजूनही पोहोचली नसून ती डोंगरात हरविली असल्याचे विदारक चित्रं आहे.

घोडनकप्पी हे जेमतेम ३० ते ३५ गोंड,कोलाम समुदायाची वस्ती असलेले गाव. जिवती तालुक्यातील पाटण जवळून १५ किमी अंतरावर वसलेले. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या या गुड्यातील आदिवासी आजही विकास म्हणजे काय? , ग्रामसभा म्हणजे काय? आमदार कोण, खासदार कोण, मंत्री कोण अशा अनेक प्रश्नापासून अनभिज्ञ आहेत.

सन १९९१-१९९२ साली हा भाग नक्षलग्रस्त असताना घोडनकप्पी गावाला आग लागून संपूर्ण गाव जळून खाक झाले. अन्न ,वस्त्र, निवारा या तीनही गोष्टी निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर पोटाची भूक भागविण्यासाठी संपूर्ण गावाचा संघर्ष सुरू झाला. गाव सुन्न झालं. सन १९९४-१९५ ला कोलाम शोधो मोहिमेअंतर्गत माजी आमदार वामनराव चटप यांनी गावापासून १ किमी अंतरावर टेकडीवर १६ घरे बांधून दिली.

मात्र परवड इथेच थांबली नाही टेकडीवर पाण्याची व्यवस्था नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी १ किमी खाली उतरून तहान भागवावी लागत होती. दिवस लोटत गेले. भुके पोटी टेकडीवरील घराचे पत्रे व सामान विकून मूळ गावात आपले वास्तव्य सुरू केले. तेव्हापासून तर आजपर्यत विकास तिथे पोहोचलाच नाही.

कित्येक वर्षे लोटली असली तरी साधा रस्ता, नाली, पिण्याचे पाणी या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत. घोडणकप्पीला जाण्यासाठी १ किमी डोंगरखोऱ्यातून दगडावरून पायी जावं लागतं. स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत या गुड्यात झेंडावंदन सुद्धा झाले नाही. गावात जायला रस्ता नाही , पिण्यासाठी पाणी नाही, राहायला पक्के घरे नाहीत, खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही अशा अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या घोडणकप्पीला विकासाची प्रतीक्षा आहे.

ग्रामसभा झालीच नाही
स्वातंत्र्यापासून आजपर्यत गावातील नागरिक ग्रामसभा, ग्रामसभेतून मिळणारी माहिती , आपल्याला मिळणारे हक्क या सर्व बाबीपासून वंचित आहेत. त्यामुळे विकासाचे पर्व अजून तिथपर्यत पोहोचले नाही.


१५ आगस्ट ला होणार झेंडावंदन
कोलाम विकास फाउंडेशन अंतर्गत १५ आगस्ट ला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झेंडावंदन होणार आहे घोडणकप्पी च्या विकासाकरिता कोलाम विकास फाउंडेशन उपोषण करणार आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com