अभयारण्यातील रस्त्यांवर रात्री "नो एन्ट्री'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भंडारा : साकोली व भंडारा तालुक्‍यात व्यापलेल्या कोका अभयारण्यातील तीन रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद ठेवण्यात यावी, याबाबत व्याघ्र प्रकल्प प्रशासन पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोका अभयारण्यातील अंतर्गत रस्त्यांवरील रहदारीला रात्री मनाई करण्यात येईल, अशी शक्‍यता आहे. यातून संबंधित ग्रामीण नागरिकांना सूट मिळू शकते.

भंडारा : साकोली व भंडारा तालुक्‍यात व्यापलेल्या कोका अभयारण्यातील तीन रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद ठेवण्यात यावी, याबाबत व्याघ्र प्रकल्प प्रशासन पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोका अभयारण्यातील अंतर्गत रस्त्यांवरील रहदारीला रात्री मनाई करण्यात येईल, अशी शक्‍यता आहे. यातून संबंधित ग्रामीण नागरिकांना सूट मिळू शकते.
मागील आठवड्यात झालेल्या टायगर सेलच्या बैठकीत एनजीओद्वारे करण्यात आलेल्या अनेक प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. कोका अभयारण्यातील वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी अभयारण्यातील रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद करण्याची मागणी सेव्ह इको सिस्टमचे शाहीद परवेज खान यांनी दोन वेळा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्याकडे केली आहे. कोका अभयारण्याचे जंगल नवीन नागझिरा अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पासोबत जुळले आहे. त्यामुळे या भागातील वाघ, बायसन असे प्राणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर येतात. याच भागातून नवेगाव-नागझिरा आणि पवनी-उमरेड-कऱ्हांडला यांच्याशी जोडणारा व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात आली. त्यावर एनएनटीआरच्या डायरेक्‍टर पूनम पाटे यांनी 30 जुलैला अभयारण्यातील तीनही रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
कोका अभयारण्यातील भंडारा-करडी मार्गावरील सालेहेटी, दुधारा, सर्पेवाडा आणि इंजेवाडा ही गावे प्रभावित होणार आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहतुकीला मनाई करण्यात येणार आहे. मात्र, यातून स्थानिक ग्रामीणांना सूट मिळणे अपेक्षित आहे. काही पर्यटक पलाडी-चंद्रपूर-कोका या मार्गाचा अधिक वापर करतात. चंद्रपूर येथे जेवण करून रात्री उशिरापर्यंत थांबतात. त्यामुळे वन्यप्राणी प्रभावित होतात. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत आहे.
तसेच साकोली तालुक्‍यातील साकोली-तुमसर या मार्गाला पर्याय म्हणून उसगाव-केसलेवाडा-परसोडी-सालेभाटा-लाखनी हा मार्ग वाहतुकीस खुला ठेवता येईल. याबाबत संबंधित तहसीलदारांकडे विचारणा केल्यानंतर अभयारण्यातील रस्त्यांवर रात्री वाहतूक बंद करण्यात येईल, अशी शक्‍यता आहे.
पर्यायी रस्ता उपलब्ध
भंडारा-करडीदरम्यान भिलेवाडा-खडकी-पालोरा मार्गे कमी लांबीचा रस्ता उपलब्ध आहे. परंतु, केवळ निसर्ग सौंदर्य आणि वन्यप्राणी पाहण्याच्या उद्देशाने खासगी वाहनांनी जाणारे नागरिक पलाडी-चंद्रपूर मार्गे जाणे पसंत करतात. मात्र, त्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. यामुळे अनेकदा वाट चुकलेले वन्यप्राणी नजीकच्या गावाकडे येतात. यामुळे त्यांच्या जीवाला धोका संभवतो. प्राण्यांचा सुरक्षित अधिवास मिळावा, अशी वन्यप्रेमींची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "No Entry" at night on the Sanctuary streets