विघ्नहर्त्याचा उत्सवच कोरोनामुळे अडचणीत! भक्‍तांच्या उत्साहावर विरजण

ganesh
ganesh

अमरावती : संकट टळावे म्हणून श्री गणेशाची आराधना केल्या जाते, तो संकट टाळतो म्हणून त्याला विघ्नहर्ताही संबोधले जाते. मात्र आता खुद्द विघ्नहर्ताच संकटात सापडला आहे. कोरोना संक्रमणाने यंदा गणेशोत्सव अडचणीत आला असून शेकडो वर्षांच्या उत्सवी प्रथेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे. यंदा प्रथमच साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार असून भक्तांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.

22 ऑगस्टपासून गणेशोत्सवास प्रांरभ होणार आहे. दरवर्षी या उत्सवाची तयारी महिनाभर अगोदरपासून सार्वजनिक मंडळ सुरू होते. यंदा मात्र सर्वत्र सामसुम आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वांत जुन्या व तब्बल 93 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या आझाद हिंद मंडळाने यंदा कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने उत्सव करणार असल्याचे मंडळाचे पदाधिकारी सोमेश्‍वर पुसदकर यांनी सांगितले.

ते म्हणाले यंदा श्री गणेशाची शोभायात्रा निघणार नाही, मुर्तीही केवळ चार फुट उंचीची राहणार असून सजावट केली जाणार नाही. पूजाअर्चा मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंस ठेवून करण्यात येणार आहे. भव्यदिव्य मूर्ती साकारणाऱ्या न्यू आझाद गणेश मंडळानेही यंदा विदर्भाच्या राजाच्या मुर्तीची उंची चार फुटावर आणली असून छोटा मंडप टाकणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिनेश बूब यांनी सांगितले.

या मंडळाची मूर्ती दरवर्षी मोठे आकर्षण राहत असून ती बघण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. नवसाला पावणारा गणपती असाही त्याचा लौकिक आहे. श्रीकृष्ण पेठ, निळकंठ, पंचशील, राजापेठ अशा जुन्या मंडळांसह जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांनी यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची भूमिका जाहीर केली आहे. वर्गणीसुद्धा घेतली जाणार नाही.

सार्वजनिक मंडळांनी यंदा प्रथा मोडू नये म्हणून साधेपणाने उत्सव साजरा करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे भव्य दिव्य मंडप, सजावट, झगमगाट, मोठ्या उंचीच्या मूर्ती, कार्यक्रम व देखावे यांना फाटा दिल्या जाणार आहे. यंदाचा गणेशोत्सव जाणवणार की नाही असा प्रश्‍न मात्र या पार्श्‍वभूमिवर उपस्थित झाला आहे.

मूर्तीकारांना फटका
दहा दिवसांच्या गणेशोत्सवावर हजारो मूर्तीकारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनाही यंदा कोरोनाने चांगलेच अडचणीत आणले आहे. लॉकडाउनमुळे मूर्तींसाठी लागणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती व नारळाच्या काथ्या मिळू शकलेल्या नाहीत. गतवर्षी शिल्लक असलेल्या मालातून जमेल तितक्‍या मूर्ती त्यांनी घडविल्या. मूर्तीला खरेदीदारही अजून आलेले नाहीत. दरवर्षी सार्वजनिक मंडळांकडून बुकिंग होते ते आतापर्यंत होऊ शकलेले नाही. त्यामुळे खरेदीदारच नसल्याने मूर्तिकारांना कामगारांना पोसणे कठीण झाले आहे. मूर्ती तयार असली तरी रंगाचे ब्रश मात्र फिरलेले नाहीत. व्यवसायच डबघाईस आल्याचे मूर्तीकार शंकर मुंद्रे यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com