file photo
file photo

रुग्णालयात जिवंत पोहोचलो तरी देव पावला!

गोंदिया : सरकारची घोषणा आहे, "गाव तिथे आरोग्यसेवा'. पण, ती सांगायला चांगली आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न्यायचे झाल्यास डोंगरदऱ्या तुडवत 10 किलोमीटरवरील दरेकसा गाठावे लागते. गावात दुचाकी बोटावर मोजण्याइतपत. मग करणार काय... रुग्णाला खांद्यावर घ्यायचे अन्‌ पायदळ रुग्णालय गाठायचे. रुग्ण जिवंत रुग्णालयात पोहोचला तर, देव पावला... आणि दगावला तर... देव कोपला, म्हणायचं व परत जगरहाटीला लागायचे... एव्हढंच टेकाकोला, मुरकुडोह 1, 2, 3 व दंडारी या पाच गावांतील गावकऱ्यांच्या नशिबात आहे.
शासन आरोग्यसेवेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. रोग्याच्या दृष्टिकोनातून गरिबांवर आर्थिक भार येऊ नये, म्हणून नवनवीन योजना राबवते. परंतु, येथील नागरिकांच्या वाट्याला हे सारे काही आलेच नाही. या पाचपैकी एकाही गावात खासगी रुग्णालयसुद्धा नाही. त्यामुळे येथील रुग्णाला दरेकसानजीक असलेल्या जमाकुडो येथील आरोग्य उपकेंद्रात जावे लागते. कारण, याच उपकेंद्रातून दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार चालतो. या गावांपासून दरेकसापर्यंतच्या दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याने आम्हीही गेलो. या रस्त्याने चालणे म्हणजे, दिव्य कसरतच होय... लहान-मोठी पाणी साचलेली डबकी, मध्येच मोठमोठे दगड, कुठे मोठे वळणमार्ग... किर्रर्र जंगलातून अंधारलेल्या वाटेने रुग्णाला खांद्यावर घेऊन मोठी कसरत करावी लागते.
तालुक्‍याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे कार्यालय सालेकसा येथे आहे. त्यांची या गावांकडे किती लक्ष आहे हा प्रश्‍नच आहे. टेकाटोला गावांत तीन हातपंप, दोन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील दोन हातपंप व एक विहीर बंद आहे. चालू स्थितीत असलेल्या पाण्याच्या स्रोतातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, पावसाळ्यात जलजन्य आजाराची नेहमीच भीती असते. या सर्व समस्यांची जाणीव आरोग्य प्रशासनाला आहे काय, हा प्रश्‍नच आहे. आणि असेलही, तर मात्र, निडर प्रशासन त्याकडे लक्षच देत नाही, असेच म्हणावे लागेल.

मुरकुडोह 1 या गावामध्ये आरोग्य उपकेंद्र व्हावे, याकरिता प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यास लवकरच बांधकाम केले जाईल. मात्र, मंजुरी केव्हा मिळते, हे सांगता येणार नाही.
- डॉ. श्‍याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com