esakal | आश्‍चर्य! विदर्भातील "या' गावात ना पेटते होळी, ना खेळतात रंग! 
sakal

बोलून बातमी शोधा

Parashram Maharaj

23 मार्च 1951 रोजी होळी पौर्णिमेला परशराम महाराज यांचे देहावसान झाले. त्यामुळे पिंपळोद व पंचक्रोशीतील गावे दु:ख सागरात बुडाली. त्यादिवशी पिंपळोद गावात एकाही घरात होळी पेटली नाही.

आश्‍चर्य! विदर्भातील "या' गावात ना पेटते होळी, ना खेळतात रंग! 

sakal_logo
By
किशोर राहाटे

येवदा (जि. अमरावती) : परमहंस परशराम महाराजांच्या कृपाप्रसादाने पुनीत झालेल्या पिंपळोद गावात गेल्या 69 वर्षांपासून होळी पेटविली जात नाही, तसेच दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला गावात कोणी रंगांची उधळणसुद्धा करीत नाही. असे हे अनोखे पिंपळोद विदर्भातील एकमेव गाव आहे. 

येवद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर पिंपळोद हे गाव आहे. परमहंस परशराम महाराज पिंपळोदवासींचे आराध्य दैवत आहे. 23 मार्च 1951 रोजी होळी पौर्णिमेला परशराम महाराज यांचे देहावसान झाले. त्यामुळे पिंपळोद व पंचक्रोशीतील गावे दु:ख सागरात बुडाली. त्यादिवशी पिंपळोद गावात एकाही घरात होळी पेटली नाही. आजतागायत ही परंपरा कायम आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण न करता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिरात कलश स्थापना करण्यात येऊन संपूर्ण गावातून परशराम महाराजांची पालखी काढण्यात येते. समाजप्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. या वेळी संपूर्ण गाव महाराजांना आपली आदरांजली अर्पित करते. 

अवश्य वाचा-  गाव लई न्यारं... महिला खुर्चीवर बसून पितात चहा, अन् पतीला म्हणतात...

परशराम महाराजांचे मंदिर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक

दत्त जयंतीच्या पर्वावर पिंपळोद येथे परशराम महाराजांची मोठी यात्रा भरते. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेकरिता लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या गावातील मुली आवर्जून माहेरी येतात. तसेच दर्यापूर तालुक्‍यातील समस्त भक्तगण महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. परशराम महाराजांच्या समाधी मंदिरात दत्ताच्या मूर्तीसह भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे परशराम महाराजांचे हे मंदिर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरले आहे. शासनाने या मंदिराला "क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. 

पिंपळोद येथे 69 वर्षांपासून होळी पेटत नसल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपदेची बचत होत आहे. प्रदूषणाला आळा बसत आहे. रंगांची उधळण होत नसल्याने पाण्याचीसुद्धा बचत होत आहे. 
- ऋषिकेश पटांगे, रहिवासी, पिंपळोद.