मूंग, उडीदाची शेतकऱ्यांकडून नोंदणीच नाही

कृष्णा लोखंडे
Wednesday, 23 September 2020

खरिपातील पहिले पीक मानले जाणारे मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र एक आठवड्यानंतरही जिल्ह्यातील शासकीय केंद्रांवर एकही शेतकरी फिरकलेला नाही.

अमरावती : खरिपातील पहिले पीक मानले जाणारे मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र एक आठवड्यानंतरही जिल्ह्यातील शासकीय केंद्रांवर एकही शेतकरी फिरकलेला नाही. त्यामुळे शासकीय खरेदीसाठी कोणत्याच केंद्रावर नोंद झाली नसून सुरू करण्यात आलेली जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगची केंद्रे सध्यातरी ओस पडली आहेत.

१५ सप्टेंबरपासून शासनाने मूग व उडदाची नोंदणी करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंगची मोर्शी, चांदूरबाजार, वरुड, अंजनगावसुर्जी, अमरावती व धामणगावरेल्वे तर जिल्हा मार्केटिंगने दर्यापूर, धारणी, तिवसा व चांदूररेल्वे अशी केंद्रे सुरू केलीत. अचलपूर आणि नांदगावखंडेश्‍वर येथील केंद्रांना अद्याप मान्यता आलेली नाही. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या दहा केंद्रांवर एकही शेतकरी फिरकलेला नाही. त्यामुळे शासकीय खरेदीसाठी नोंद झालेली नाही.

वाचा - शरद पवार यांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, का केला माजी मुख्यमंत्र्यांनी हा दावा?

यंदा खरिपात ऑगस्ट महिन्यातील संततधार पावसाने मूग व उडदाची वाताहत केली आहे. जिल्ह्यात १५ हजार हेक्‍टर क्षेत्र मुगाखाली तर पाच हजार हेक्‍टर क्षेत्र उडदाखाली आहे. कृषी विभागाच्या कापणी प्रयोगात मुगाचे सरासरी उत्पादन २५ किलो प्रती हेक्‍टर आले आहे. उडदाचीही तीच गत आहे. त्यामुळे यंदा या उत्पादक पट्ट्यातच सरासरी येण्याची शक्‍यता नसल्याने शासकीय केंद्रांवर नोंदणी होईल का?, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान सरकारने मुगाला ७ हजार १९६ तर उडदाला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे. या हमीदराचा शेतकऱ्यांना कितपत लाभ मिळेल असाही प्रश्‍न आहे.

संपादन - नरेश शेळके

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No registration of moong and urad dal by farmer on govt. center