कोरोनाचे गांभीर्य सरले की काय? नागरिक बिनधास्त

सुधीर भारती
सोमवार, 13 जुलै 2020

सुरुवातीला कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सरकारने लॉकडाउन केले. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनीसुद्धा कोरोनाला गांभीर्याने घेतले. नागरिक आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यास प्राधान्य देत होते, मात्र कोरोना काही केल्या संपत नसल्याने शासनानेसुद्धा अनलॉक केले.

अमरावती : काही केल्या कोरोना जातच नाही, घरात किती दिवस बसायचे, काहीही केले तरी कोरोना होणारच आहे, अशी बेफिकीर वृत्ती मनामध्ये येत असल्याने अनेक नागरिकांनी कोरोनाकडे गांभीर्याने बघणेच बंद केल्याची धक्कादायक बाब मानसतज्ज्ञांच्या पाहणीत आढळून आली आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते या प्रवृत्तीला पॅन्डॅमिक फटिंग, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे लॉकडाउन संपताच नागरिकांमध्ये एक प्रकारची धोकादायक सकारात्मकता आल्याचेही मानसतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरुवातीला कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सरकारने लॉकडाउन केले. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनीसुद्धा कोरोनाला गांभीर्याने घेतले. नागरिक आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यास प्राधान्य देत होते, मात्र कोरोना काही केल्या संपत नसल्याने शासनानेसुद्धा अनलॉक केले.

हळूहळू उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. वास्तविक त्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच वाढला, मात्र नागरिकांनी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचा निष्कर्ष काढत बिनधास्तपणे आपले व्यवहार सुरू केले. मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतरही नागरिकांची गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी कोरोना जातच नसल्याने नागरिकांनीसुद्धा बिनामास्क फिरणे सुरू केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे, एकाच दुचाकीवर तीन जणांचा प्रवास अशा बेपर्वावृत्तीने नागरिकांच्या वागणुकीत बदल झाल्याचे आढळून येत आहे.

दुसरीकडे समाजात एक असा वर्ग आहे की तो अद्यापही घाबरलेल्या स्थितीत आहे. घराच्या बाहेर निघण्यास तयार नाही. अशा दुहेरी मानसिकतेमध्ये सध्या नागरिकांची कोंडी झालेली आहे. अनेकजण मास्क केवळ शोभेसाठीच वापरतात. दुसऱ्याची कुठलीही पर्वा करीत नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट भावना पुरोहित यांनी सांगितले, कोरोना झाला तरी आपण लवकरच बरे होऊ, ही सकारात्मकता ठीक आहे. मात्र आपल्याला कोरोना होणारच नाही, त्यामुळे आपण बिनधास्त राहिले पाहिजे, ही घातक सकारात्मकता आहे.

सविस्तर वाचा - अरेच्चा! तो झाला प्रेयसी असलेल्या महिला पोलिसासह क्‍वारंटाईन अन्‌ बायको गेली पतीच्या शोधात पोलिस ठाण्यात

समाजासाठी धोकादायक
आपल्याला काहीच होणार नाही तसेच काहीही केले तरी कोरोना होणारच आहे, अशा मानसिकतेमध्ये एक मोठा वर्ग आज समाजात वावरताना दिसत आहे. वास्तविक अशा प्रकारातील लोक दुसऱ्यांसाठी, समाजासाठी धोकादायक ठरत आहेत. कोरोना झाल्यास तो बरा होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. काही जण धास्तीत जीवन जगत आहे. साधा सर्दी, खोकला, ताप आला तरी ते घाबरून जातात. अशा स्थितीत न घाबरता डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार केले पाहिजे.
भावना पुरोहित, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट, इर्विन हॉस्पिटल.

 

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No siriousness about corona in people