कॉंग्रेसकडेही उमेदवारीसाठी भाऊगर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पक्षांतर करीत असताना कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी (ता. एक) संसदीय मंडळासमोर झालेल्या मुलाखतीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. हे चित्र आश्‍वस्त करणारे असून कॉंग्रेस नव्या जोमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीसाठी तयार असल्याचे संकेत आहे.

यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पक्षांतर करीत असताना कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी (ता. एक) संसदीय मंडळासमोर झालेल्या मुलाखतीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. हे चित्र आश्‍वस्त करणारे असून कॉंग्रेस नव्या जोमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीसाठी तयार असल्याचे संकेत आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपने कब्जा केल्याने कॉंग्रेसची शक्ती हीन झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकच आमदार पुसद मतदासंघात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडले तर कॉंग्रेस सत्तेपासून दूर आहे. भविष्यातील राजकीय घडामोडी बघता जिल्हा परिषदेतही कॉंग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येईल, अशी स्थिती आहे. एकूणच सत्तेपासून दूर असलेली कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. गुरुवारी (ता. एक) जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयात कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी आमदार बबनराव तायवाडे, यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक श्‍यामबाबू उमाळकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आदींनी मुलाखती घेतल्या. दुपारी एक वाजता मुलाखतीला सुरुवात झाली. विधानसभानिहाय झालेल्या मुलाखतीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनही केले. सात विधानसभा मतदारसंघातून तब्बल 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. वणी तसेच यवतमाळ या दोन विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक होते. दोन्ही विधानसभा मतदार संघातून प्रत्येकी 15 व 17 जणांनी मुलाखती दिल्या. तर, पुसदमधून एकाच उमेदवाराने मुलाखत दिली. यंदा ज्येष्ठ नेत्यांसोबत युवकांनीही दावेदारी ठोकली. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, ऍड. शिवाजीराव मोघे, कॉंग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या सव्वालाखे व प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जावेद अन्सारी आदी दिग्गज नेत्यांसोबत युवकांचा समावेश आहे.

माणिकराव ठाकरे यांना दिग्रसमधून लढण्याची विनंती
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी दारव्हा-दिग्रस-नेर विधानसभेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nomination to Congress too