सात-बाराची नोंद दाखवा, नंतरच तूर खरेदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी नोंदणीत अडचणी
शासनाने सुधारित आदेश काढण्याची मागणी

अकोल : शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारावर तूर पिकाची नोंद आहे, त्याच शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर हे आंतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणी करताना अडचणी येत आहे. यापूर्वी तूर आंतर पीक असले तरी ते पूर्ण ग्राह धरण्याबाबात मंत्रिमंडळाने आदेश काढला होता. आता पुन्हा तीच अडचण येत असल्याने सुधारित आदेश काढण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

 

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संकटाकडे नेता कामा नये. तूर पिकाचे क्षेत्र कमी न लक्षात घेता पूर्ण लक्षात घ्‍यावे. यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी पीक ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्‍टीमुळे आधीच हातातून गेले आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाने संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्‍यक आहे. यावर्षी नाफेडमार्फत आधारभूत किंमतीत खरेदी होत असलेल्‍या तुरीचे क्षेत्र व उत्‍पादकता 1 जानेवारी 2020 च्‍या शासन आदेशानुसार कमी नोंदविण्‍यात येत आहे. तूर हे आंतरपीक असल्‍याने एकल पीक गृहीत धरून 100 टक्के उत्‍पादकता नोंदविण्‍यात यावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

सन 2018 मध्ये मंत्रिमंडळाने घेतला होता निर्णय
सन 2017 च्‍या हंगामात हमी भावाने तूर नोंदणीबाबत अडचणी आल्यानंतर आ. सावरकर यांनी शासनाकडे हा प्रश्‍न मांडला होता. सन 2018 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळात या विषयाचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्‍हा मार्केटींग अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात 100 टक्के तुरीचे क्षेत्र ग्राह्य धरून नोंदणी करण्याचा आदेश दिला होता.

आणखी 23 दिवसांचा अवधी
खरीप हंगाम 2019-20 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमी भावाने तूर खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दि महाराष्‍ट्र स्‍टेट को-ऑपरेटिव्‍ह मार्केटींग फेडरेशन लि. मुंबई यांचे कडून सर्व जिल्‍हा मार्केटींग अधिकारी यांच्यामार्फत केली जात आहे. ही नोंदणी 1 जानेवारी 2020 पासून सुरू झाली आहे. नोंदणीसाठी 14 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आणखी 23 दिवस नोंदणीसाठी शिल्लक आहेत. त्यामुळे तातडीने आदेश काढून तुरीचे क्षेत्र 100 टक्के ग्राह्य धरण्याबाबत शानाने आदेश काढण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे.

 

शेतकऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ नये!
यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी नैसर्गिक संकटा सापडला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही शेतकऱ्यावर अन्‍याय होता काम नये. रास्‍त व नियमित मागण्‍यासाठी शेतकऱ्यांना नाहक संघर्ष करण्‍याची वेळ येणार नाही याची दक्षात घेवून शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍यासाठी तातडीने तूर खरेदीबाबत सुधारित आदेश निर्गमित करावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी शासनाकडे केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Note on the sat-bar, only buy the tour