
Success Story : खडकाळ जमीन काही तासातच झाली सुपीक; शेतकऱ्याने रिस्क घेतली अन्...
मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यांतील पिंपरी अवगण येथील शेतकरी पुत्र सुभाष राठोड यांच्याकडे खडकाड जमीन होती. त्या जमिनीला सुपीक करण्याकरिता बरेच कष्ट केलेत तरीही ती जमीन सुपीक होत नव्हती. अशा जमिनीचे करावे तरी काय असा यक्षप्रश्न राठोड यांच्या समोर उभा ठाकला होता.
या विचारात मग्न असताना व्हाट्सअपच्या माध्यमातून youtube द्वारे मध्यप्रदेश मधील कंपनीच्या गोटे वेचण्याच्या मशीनचा व्हिडिओ त्यांनी बघितला व या मशीन द्वारे आपल्या शेतातील व आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक करण्याला मदत होईल या विचारांनी त्यांनी ही मशीन विकत घेतली.
त्यानंतर त्यांनी स्वतःची शेती सुपीक केली. त्यानतंर इतर शेतकऱ्यांकरिताही अल्प दरामध्ये ही मशीन उपलब्ध करून दिली. शेती चांगली पिकावी व उत्पन्न चांगले व्हावे तसेच शेती सुपीक व्हावी यासाठी नवीन नवीन शोध लावत आहेत.
शेतीच्या दिमतीला नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्याचा चांगलाच फायदा होतोय. या मशीनद्वारे मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा,वाशिम अशा तालुक्यामधील शेतकरी आपली जमीन सुपीक करण्याकरिता या मशीनची मदत घेत आहेत.
शेती न परवडणारा एक व्यवसाय झालेला आहे. मजुराची मजुरी वाढलेली असून निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोडाशी आलेला घास वाया जात आहे. या सर्व आपत्ती मधुन चुकून भरघोस उत्पन्न घेतल्या वर उत्पन्नाला योग्य दर मिळत नाही.
यामुळे गोट्याच्या व्यवस्थेकरिता मजूर लावणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. परंतु सुभाष राठोड यांनी आणलेल्या या मशीनच्या साह्याने "घंटो का काम मिनटो में", या म्हणीप्रमाणे शेतामधील संपूर्ण गोटे काही घंट्यातच साफ होतात.
या मशीनद्वारे शेकडो एकर जमीन सुपीक झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुत्राचे परिसरातील शेतकरी कौतुक करत आहेत.