esakal | जेष्ठांच्या लसीकरणाचाच गोंधळ तरुणांना लस मिळणार कुठून? अमरावतीत काही तासांतच संपला साठा

बोलून बातमी शोधा

null

जेष्ठांच्या लसीकरणाचाच गोंधळ तरुणांना लस मिळणार कुठून?

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः पहाटेपासूनच हाती बिस्कीटाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या घेऊन कडाक्‍याच्या उन्हात आपला नंबर येण्याची वाट पाहत असलेली ज्येष्ठ मंडळी आजही निराश होऊन परतली. कोरोना लसीकरणाचा गोंधळात गोंधळ सध्या सुरू असून नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरा डोज असलेल्यांनाही परत जावे लागत असल्याने या मोहिमेच्या उपयुक्ततेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: 'आता तरी वेगळ्या विदर्भाची निर्मिती करा'; आशिष देशमुखांचं राज्यपालांना पत्र

लसीकरण मोहिम सुरूवतीपासून गोंधळलेली दिसून आली. लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध होताना दिसत नाही. कधी 25 हजार तर कधी 13 हजार लशींचासाठा दिला जातो आणि तो अवघ्या काही तासांतच संपून जातो. मागील अनेक दिवसांपासून असाच नित्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात 135 लसीकरण केंद्रांपैकी 95 टक्के केंद्र बंद पडले आहेत. शुक्रवारी प्राप्त 13 हजार लशींचा साठा अवघ्या काही तासांतच संपला. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. विशेष म्हणजे कुठल्याच लसीकरण केंद्रांवर नागरिकांसाठी मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नाहीत.

पर्यायाने ज्येष्ठांना खाली जमिनीवरच आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते सर्वाधिक गोची झाली आहे ती दुसरा डोस घेणाऱ्यांची, अनेकांनी पहिला डोस कोवॅक्‍सिनचा घेतलेला आहे, मात्र सद्या कोव्हिशिल्डचा पुरवठा शासन स्तरावरून केला जात असल्याने दुसरा डोज असलेल्यांना परत जावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर लशी आहेत की नाहीत, कोणत्या लसी आहेत, अशा कुठल्याही सूचना दिल्या जात नाहीत. आरोग्य कर्मचारी सुद्धा उत्तरे देताना कंटाळले आहेत.

हेही वाचा: 'दीपाली चव्हाण प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू' : यशोमती ठाकूर

किमान लसी किती उपलब्ध आहेत ते तरी सांगावे म्हणजे उन्हात रांगेत उभे राहण्याचे काम राहणार नाही, असे काही ज्येष्ठांनी सांगितले. एकूणच तुरळक लससाठा येत असून तोसुद्धा काही तासांतच संपून जात आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे.

शुक्रवारी 13 हजार लशींचा साठा उपलब्ध झाला असून त्याचा पुरवठा केंद्रांवर करण्यात आला आहे. लससाठा पुरेसा असल्यास ही मोहिम सुरळीत चालू शकते. शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे.
विनोद करंजीकर, लसीकरण अधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ