सकाळी उठल्यापासून स्वच्छता हाच तिचा धर्म, कोण आहे ही सेवाभावी...

An old woman cleans the streets with a broom in hand
An old woman cleans the streets with a broom in hand

पवनी (जि. भंडारा) : जवाहर गेटसमोरील परिसर हे शहरातील वर्दळीचे ठिकाण. हॉटेल व इतर व्यावसायिकांच्या दुकानांतून बाहेर पडणारा कचरा सभोवताल रस्त्यावर विखुरलेला. एक वृद्धा मात्र निमूटपणे दररोज हा रस्ता हातात झाडू घेऊन स्वच्छ करते, कचरा गोळा करते. तिची मानसिक स्थिती बरी नाही. ती वेडसर आहे, असा साऱ्यांचा अंदाज. स्वत:ला सुज्ञ समजणारे लोक कचरा करून जातात. मात्र ही दररोज मुकाट्याने विनातक्रार रस्ते झाडून काढते. जगाच्या नजरेत ती वेडी असली तरी तिच्यासारखे शहाणपण कुणातही नाही.

बेबीताई काटेखाये असे या महिलेचे नाव. ती मूळची तालुक्‍यातील खैरी येथील असल्याचे समजले. दोन वर्षांपासून ती पवनीत वास्तव्यास आहे. वय अंदाजे 70 च्या घरात. वृद्धत्वामुळे कणा वाकलेला, तरीही ताठ मानेने जगणारी. स्वत:च्या जगात वावरणारी. कधी कोणालाही शिव्या, त्रास न देता, कुणासमोरही अन्नासाठी हात न पसरता जगणारी. ही बेबीताई सध्या जवाहरगेट परिसरातील सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही अपेक्षेविना नि:स्वार्थपणे काम करणारी ही वृद्धा खऱ्या अर्थाने स्वच्छतादूत ठरली आहे.

मनोरुग्ण म्हटले की बडबडणारी, दगड भिरकावणारी, अस्वच्छ व टाकलेले अन्न खाणारी व्यक्ती समोर येते. त्यांचे विक्षिप्त हावभाव व वागणे पाहून अनेकदा पाहणाऱ्यांना भीती वाटते. पवनीत असे काही वेडसर रस्त्यावरून फिरताना आढळतात. परंतु, बेबीताई याला अपवाद ठरली आहे. तिच्या या कृतीमुळेच तिने परिसरातील नागरिकांना लळा लावला आहे.

तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्याच तंद्रीत. घरंदाज महिलेप्रमाणे तिने हळूच डोक्‍यावर पदर घेतला. तिचा निरागस, पण बोलका चेहरा दुखा:तही आनंदी राहावे असे सांगणारा. एक हलकेसे स्मित व समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. समाजाने वेडी ठरवलेली ही वृद्धा तिच्या जगण्यातून, कृतीतून वेड्यासारखे वागणाऱ्या माणसांना जणू शहाण्यासारखे वागण्याचा संदेश देत आहे.

वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता

ती रोज सकाळी हातात झाडू घेऊन जवाहर गेटसमोरील परिसराची स्वतः झाडून स्वच्छता करते. इतकेच नव्हेतर दररोज अंघोळ करून ती आपलीही निगा राखते. लोक स्वत:हून तिला खायला देतात. यातील पहिला घास ती देणाऱ्यांना भरवते. जवळ पशू, पक्षी, जनावरे दिसल्यास मिळालेले अन्न त्यांच्याशी वाटून खाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com