अमरावतीतील "मिशन, एक झाड माझं' मोहिमेमुळे परीसर झाला हिरवा

भूषण काळे
सोमवार, 29 जून 2020

प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱ्या झाडांना जगविण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी "एक झाड माझं' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या दिशा फाउंडेशन आणि वस्तू व सेवा कर विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी तपोवन संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे.

अमरावती : पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व अलिकडे नागरिकांना कळायला लागले आहे. परिणामी अनेक संस्था आपापल्या परीने पर्यावरण रक्षणाचे कार्य आनंदाने शिरावर घेऊन झाडे लावा आणि जगवा ही मोहिम राबवित आहेत.

प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱ्या झाडांना जगविण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी "एक झाड माझं' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या दिशा फाउंडेशन आणि वस्तू व सेवा कर विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी तपोवन संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे.

मागील वर्षीपासून "एक झाड माझं' या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
शासन आपल्या स्तरावर झाडे लावण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून दिशा फाउंडेशन व जीएसटी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी एकूण 600 झाडांचे रोपण करण्यात आले. त्यातील तब्बल 50 टक्‍क्‍यांवर झाडे आजही जिवंत आहेत. यावर्षी एक हजार झाडांचा संकल्प आहे. तपोवन संस्थेने यासाठी जागा तर वनविभागाने झाडे उपलब्ध करून दिली आहेत. यावर्षी वृक्षसेवेकरिता खड्डे खोदण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत दररोज फक्त दहा वृक्षप्रेमी मास्क लावून सहभागी होत आहेत.

या उपक्रमात जीएसटीचे सहआयुक्‍त तेजराव पाचरणे, उपायुक्‍त विनोद देवडेकर, सुनील कडू, यादव तरटे पाटील, मंगेश सगणे, अमित ओगले, राजेश कोचे, प्रफुल्ल गावंडे, विक्‍की आठवले, सुशांत मेश्राम, सागर मोटघरे, निशांत वासनिक, अमोल डोंगरे, अमित सोळंके, प्रदीप जवंजाळ, मनीष जामनेकर, मेघल पोतदार, श्रीपाद टोहरे यांचा समावेश आहे. तपोवनचे सचिव वसंत बुटके, अशोक फरांदे यांनी उपक्रमाला भेट दिली, तर डॉ. संजय रेड्डी, डॉ. पंकज कावरे यांनी वृक्षारोपणाला सहकार्य केले.

देशी झाड
एक झाड माझं मोहिमेअंतर्गत केवळ देशी झाडांचेच रोपण केले जाणार आहे. यात आंबा, चिंच, आवळा, बिहाडा, मोह, कडुलिंब, रामफळ, सीताफळ, सेमल, बांबू, पिंपळ, वड, उंबर, भोकर, जांभूळ, फणस, कवठ, रिठा, पेरू, खैर आदी झाडांचा समावेश आहे. बियांचीदेखील रोवणी केली जाणार आहे. एक झाड माझं मोहीम आता माणसांच्या मनात घर करू लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तसेच वाशीम, वर्धा व शेगाव शहरात नागरिकांनी ही मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

ही एक लोकचळवळ
एक झाड माझं ही मोहीम एका व्यक्तीची किंवा संस्थेची नसून ही लोक वृक्षचळवळ आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करीत असताना जीएसटी विभाग व तपोवन संस्थेच्या पुढाकाराने याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली याचा आनंद वाटत आहे.
यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One tree mission in Amaravati