अरे देवा...‘त्या’ कापसाच्या काय वाता करायच्या?

अनुप ताले
Sunday, 26 April 2020

यंदा कापूस हंगाम लांबल्याने, उशिरापर्यंत कापूस निघाला. कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुद्धा संथ गतीने राबविण्यात आली आणि नंतर लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद होते. त्यामुळे हंगामातील निम्‍म्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समिती अंतर्गत परवानधारक खासगी व्यापाऱ्यांना मूर्तिजापूर व्यतिरीक्त सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कापूस खरेदी सुरू करण्यास जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी देत 22 एप्रिलपासून काही अटीशर्तींसह कापूस खरेदीच्या सूचना दिल्या. परंतु, सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रावर केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जाईल व शेतकऱ्यांनी तसाच कापूस विक्रीस न्यावा असे, सूचित करण्यात आल्याने, एफएक्यू दर्जा नसलेल्या कापसाचे करायचे काय? या चिंतेने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात 22 एप्रिलपासून कापूस खरेदीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. परंतु, शेतकऱ्यांनी सीसीआय व कॉटन फेडरेशनकडे फक्त एफएक्यू दर्जाचाच कापूस विक्रीस नेण्याची सूचना करण्यात आल्याने, कापूस उत्पादक कोंडीत सापडला आहे. या अटीमुळे कापूस उत्पादकांवर अन्याय होत असून, शेतकऱ्यांचा सर्व कापूस विनाअट खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

 

यंदा कापूस हंगाम लांबल्याने, उशिरापर्यंत कापूस निघाला. कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुद्धा संथ गतीने राबविण्यात आली आणि नंतर लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद होते. त्यामुळे हंगामातील निम्‍म्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समिती अंतर्गत परवानधारक खासगी व्यापाऱ्यांना मूर्तिजापूर व्यतिरीक्त सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कापूस खरेदी सुरू करण्यास जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी देत 22 एप्रिलपासून काही अटीशर्तींसह कापूस खरेदीच्या सूचना दिल्या. यानंतर कापूस पणन महामंडळाच्या बोरगाव मंजू, कानशिवणी, तेल्हारा, केंद्रावरही खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. परंतु, सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रावर केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जाईल व शेतकऱ्यांनी तसाच कापूस विक्रीस न्यावा असे, सूचित करण्यात आल्याने, एफएक्यू दर्जा नसलेल्या कापसाचे करायचे काय? या चिंतेने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

 

विना अट, सरसकट कापूस खरेदी करा
या वर्षी येन हंगामात पाऊस पडल्याने कापसाचा दर्जा राज्यभर घसरला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर नॉन एफएक्यू कापूस असल्याने हा कापूस कोणाला विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. असे असताना, कापसाची नोंदणी नोटकॅममध्ये कापसासोबत सेल्फी काढून ऑनलाइन नोंदणी करावी तसेच विक्रीसाठी एफएक्यू दर्जाचाच कापूस आणावा, असे सूचित करण्यात आले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे तेव्हा, सर्व शेतकऱ्यांचा सर्व कापूस विनाअट खरेदी करण्यात यावा. कापसाची नोंदणी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर करावी. शेतकऱ्यांना कापूस खरेदीच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत द्याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ. निलेश पाटील, धनंजय मिश्रा यांनी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only FAQ cotton is being procured in Akola