अखेर शाळेतील घंटा वाजली, पण विद्यार्थी नगण्यच

 only few student came to school on first day in gadchiroli
only few student came to school on first day in gadchiroli

गडचिरोली : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूशी मानवाची झुंज सुरू असताना राज्य सरकारने शाळा उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार सोमवार (ता. 23) नववी ते बारावीपर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण  295  शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अनेक नियम, कोरोनाची भीती व पालकांचा निरुत्साह यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळकच होती.

यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाला. तेव्हापासूनच शाळा, महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीतही बराच गोंधळ झाला. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यावर 26 जून रोजी शालेय सत्र प्रारंभ होत असते. पण, कोरोना विषाणूचा ठिय्या अद्याप हलला नसून कोरोनाची लससुद्धा किंवा इतर प्रभावी उपचारसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शालेय सत्र लांबतच गेले. अखेर तब्बल चार महिने लांबलेले हे शालेय सत्र अखेर सोमवारी प्रारंभ करण्यात आले. पण, या शाळासुद्धा केवळ नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यातही दररोज केवळ चार तासिका होणार असून या शाळा दोन तास चालणार आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय फक्त शाळेत शिकवण्यात येतील. इतर विषय व उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायचा आहे. 

गडचिरोली जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने सरकारचे सर्व आदेश काटेकोर पाळत जिल्ह्यातील संपूर्ण 295 शाळा सुरू केल्या. तत्पूर्वी 19 नोव्हेंबरपासून जिल्ह्याच्या शाळांमधील 3 हजार 275 मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 111 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना शालेय सत्रापासून दूर ठेवत हे सत्र प्रारंभ करण्यात आले. त्यापूर्वी सर्व शाळांची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला वापरण्यात आला असून वर्गातील निम्मे विद्यार्थी पहिल्या दिवशी, तर निम्मे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी वर्गात बसणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बाक ठेवण्यात आला आहे. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी येताच त्यांचे स्वागत हॅण्ड सॅनिटायझर व साबणाने झाले. विद्यार्थ्यांना निर्जंतुक करून त्यांनी मास्क लावला की, नाही याची पाहणी करून वर्गात सोडण्यात आले. शिवाय पालकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी शिक्षण विभागाने पालकसभाही घेतल्या. तरीही शाळेत येणारे विद्यार्थी फारसे उत्साही दिसले नाहीत.

धाकधूक कायम -
सर्व काळजी घेऊन शाळा व पालकांचे प्रबोधन करून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी कोरोनाची धाकधूक कायम असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवणेच पसंत केले. गडचिरोली, देसाईगंजसह इतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमीच होती. शाळेचा हा पहिला दिवस पार पडला, तरी या शाळा किती दिवस सुरू राहतील, हे सांगणे कठीण आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com