
दोन रेल्वे रुळांमध्ये असलेले काली मातेचे एकमेव मंदिर; ब्रिटिशही झाले नतमस्तक
तुमसर (जि. भंडारा) - मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी (तुमसर रोड) येथे दोन रेल्वे रूळादरम्यान जागृत कालीमातेचे पुरातन मंदिर आहे. एका आख्यायिकेनुसार इंग्रजांना या देवीने नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. भारतातील पहिली प्रवासी ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पर्यंत धावली, पण त्यापूर्वीही देशांमधील प्रथम औद्योगिक ट्रेन ही सन १८३७ मध्ये रेड हिल्स वरुन मद्रास च्या चितंद्रीपेटकडे धावली होती. नागपूर ते भंडारा पहिली ट्रेन १२ मार्च १८८१ रोजी धावली होती. ब्रिटिश रेकॉर्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागपूर ते देव्हाडी (तुमसर रोड) पर्यंत ही ट्रेन धावली होती. या मार्गावर रेल्वे रूळ बसवितांना सूर नदीवरील पूल बराच आव्हानात्मक होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच मे १८७९ दरम्यान परीसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे सदर रेल्वेचा प्रकल्प खूप लांबणीवर पडला होता.
सदर मार्गावर रुळांच्या खाली मांडण्यात येणारे लाकडी स्लीपर पुरवण्याचे काम वनविभागाला देण्यात आले होते; परंतु वन विभागाच्या दिरंगाईमुळे इंग्लंडहून २५००० पाइन स्लीपर प्राप्त करण्यात आले. रेल्वे रूळ बसविण्याचे का पूर्ण झाल्यानंतर इंग्लंड वरून वाफेचे इंजिन (Steam Locomotive) आणण्यात आले होते. कोळसा डेपो, पाणी चार्जिंगची व्यवस्था, टेलीग्राफ या सर्व व्यवस्था देव्हाडी (तुमसर रोड) येथे आधीच करण्यात आल्या होत्या.
तुमसर रोड रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन व चार यांच्या रेल्वे रुळांच्या मधोमध असलेल्या काली मातेच्या मंदिराची कथा खूप रंजक व रहस्यमय आहे. येथील जुनी आख्यायिका आहे की, ज्यावेळी इथे रेल्वेचे काम करण्याकरिता बंगालमधून बहुसंख्य कामगार आले होते. ज्या ठिकाणी रेल्वेचे काम सुरू होते, त्या कामाच्या आराखड्यानुसार रेल्वे ट्रॅकच्या मध्ये काली मातेचे मंदिर येत होते; परंतु इंग्रज शासनाला सदर ट्रॅकच्या विस्ताराची गरज पडली तेव्हा मंदिर मध्यस्थी येत होते. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मंदिर हलविण्याचा बराच प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. काली मातेने मुख्य अधिकाऱ्याच्या स्वप्नात जाऊन हे मंदिर हलविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत त्यांना सांगितले. जेव्हा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्या कामात आपत्तीचा सामना करावा लागला. सरतेशेवटी त्यांनी मंदिर तोडण्याचा विचार सोडून दिला आणि मंदिर तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी रेल्वे ट्रॅक समायोजित केला. आजही भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड (देव्हाडी) स्टेशनवर दोन रेल्वे रुळांच्या मध्यस्थी हे मंदिर बघायला मिळते.

स्थानिक भाविक भक्तांनी कालांतराने या ठिकाणी देवीची सुंदर व सुबक देखण्या मूर्तीची स्थापना केली. स्थानिक भक्तगण या ठिकाणी दररोज पूजा अर्चना करतात. स्थानिक नागरिकांसोबत रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी देवीच्या पूजेत सहभागी होतात. दुर्गा मातेचा काली माता हा एक रूप आहे, त्यामुळे दुर्गा उत्सवात येथे भाविकांची गर्दी असते. जरी आख्यायिका सांगितली गेली असली तरी दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध असलेले कालीमातेचे मंदिर एक श्रद्धेचे अढळ स्थान मानले गेले असून सध्या भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. संपूर्ण भारतात रेल्वे ट्रॅक दरम्यान हे एकमेव मंदिर असल्याची माहिती आहे. येथे चैत्र व शारदीय नवरात्राला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. अष्टमीला हवन व नवमीला फलाट क्रमांक एक वर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद आयोजित केला जातो. वर्षभर ही कालीमातेची सकाळ सायंकाळ आरती केली जाते.
स्टेशनात दहिवडे विक्रेत्याचा परिवार आताही देवीच्या सेवेत...
मुंबई कलकत्ता रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतरतुमसर रोड रेल्वे स्थानकावर दहीवडा विक्रीचा व्यवसाय करणारे रामदिन गयाप्रसाद गुप्ता यांनी देवी मातेच्या शिळांजवळ देवीची सगुण मूर्ती बसविली व ऊन, पावसापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी लहानसे छप्पर उभारले. या मूर्तीची सेवा त्यांचे वंशज शंकर गुप्ता व यश गुप्ता हे करत आहेत. याठिकाणी रेल्वेचे अधिकारी देवीला नतमस्तक होण्याकरिता येथे येत असतात व दसऱ्याच्या दिवशी स्टेशनवर होणारे पूजा अधिकाऱ्यांच्या हस्ते केली जाते.
तरीही देवीच्या शिळा हलल्या नाहीत..!
आधी या ठिकाणी काली मातेची सांगीन मूर्ती नव्हती. जेव्हा रेल्वे बंगाल वरून आलेल्या कामगारांनी ब्रिटिशांच्या आदेशावरून देवीच्या मूर्तीच्या शिळा हलविण्याचा प्रयत्न केला; तरीही त्या हलल्या नाही. त्या नंतर त्यांनी मोठं- मोठ्या लोखंडी साखळ्या शिळांना गुंफून रेल्वेच्या इंजिनाद्वारे ओढण्यात आल्या, तरीही इंग्रजांना देवी मातेला तिथून हलवणे शक्य झाले नाही; त्यावेळी त्यांना काली मातेसमोर नतमस्तक व्हावे लागले.