Nagpur संत्रा झाला भंगारापेक्षाही स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Orange Price : संत्रा झाला भंगारापेक्षाही स्वस्त

शेंदूरजनाघाट : कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, तर कधी हवामान बदलाचा फटका शेतकरीवर्गाला नेहमीच सहन करावा लागतो. त्यातच यंदा व्यापारी पडेल भावात संत्रा खरेदी करीत आहेत. सध्या भंगाराला ३५ रुपये भाव आहे, त्या तुलनेत आरोग्यवर्धक संत्र्याला प्रतिकिलो १५ ते २० रुपयेच भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

वरुड तालुक्यात शेकडो कोटींची उलाढाल करणारा व्यवसाय हा संत्र्याचा आहे. यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहराला अति उष्णतामानाचा फटका बसला. त्यामुळे फुटलेल्या बहरापैकी अर्धा बहर गळून गेला. त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीला मृगनक्षत्रात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे संत्राझाडांना मृगबहराची संत्री फुटलीच नाही. पुढे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात झालेल्या अतिपावसाने कधी नव्हे ती संत्राफळांना गळती लागली. त्यातच झाडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांजळ २५ टक्केही संत्रा राहिला नाही. असे असतानाही व्यापाऱ्यांनी संत्र्याचे भाव पाडले.

सध्या संत्र्याचे भाव ३० ते ३५ हजार रुपये टन व कॅरेटचे भाव ७०० रुपये प्रति कॅरेटच्या वर असायला हवे होते. मात्र व्यापाऱ्यांनी भाव एवढे पाडले की भंगार ३५ रुपये किलो खपत असताना संत्रा २० रुपये किलोही विकल्या जात नाही. त्यामुळे संत्र्याला राजाश्रयाची नितांत गरज असून शासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

आजवर संत्र्याच्या दररोज ५० ते १०० गाड्या बांगलादेशला जायच्या. परंतु कस्टम ड्यूटी वाढल्याने केवळ ८ ते १० गाड्याच जात असल्याने संत्र्याचा उठाव नाही. पूर्वी ४८ रुपये ड्यूटी होती. परंतु ती वाढली. ती वाढली नसती तर आज संत्रा ३४ ते ५० रुपये किलो, या भावाने विकल्या गेला असता.

सार्वत्रिक संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणात असताना व बाजारात संत्रा कमी असतानाही संत्र्याचे पडलेले भाव शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण आहे. शासनाने संत्रा उत्पादकांना कमीत कमी २.५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.

-स्वप्नील देसली, संत्रा उत्पादक, तिवसाघाट