esakal | १३ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली मोहझरीत दारूविक्री; गावकऱ्यांनी घेतली दारूविक्री बंद करण्यासाठी बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मागील दोन महिन्यांपासून दारूविक्रेत्यांनी विक्री सुरू करून गावातील शांतता भंग केली आहे. गावात सुरू असलेल्या दारूविक्रीविरोधात लढा देण्यासाठी गाव संघटना पुनर्गठित करण्यात आली. पुन्हा आपले गाव दारूमुक्त करण्याचा निर्णय संघटनेने यावेळी घेतला आहे.

१३ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली मोहझरीत दारूविक्री; गावकऱ्यांनी घेतली दारूविक्री बंद करण्यासाठी बैठक

sakal_logo
By
प्रशांत झिमटे

आरमोरी (जि. गडचिरोली) : तब्बल १३ वर्षांपासून बंद असलेली मोहझरी गावातील दारू पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे येथे गाव संघटनेची पुनर्स्थापना करून हा गाव दारूमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्‍यातील मोहझरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी बैठकीचे आयोजन करून नुकतीच चर्चा करण्यात आली.

गावात सुरू असलेल्या दारूविक्रीविरोधात लढा देण्यासाठी गाव संघटना पुनर्गठित करण्यात आली. पुन्हा आपले गाव दारूमुक्त करण्याचा निर्णय संघटनेने यावेळी घेतला आहे. मोहझरी येथे २००७ ते २०२० या १३ वर्षांच्या कालावधीत दारूविक्री पूर्णतः बंद होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून दारूविक्रेत्यांनी विक्री सुरू करून गावातील शांतता भंग केली आहे.

गावात संयुक्त बैठक

दारूविक्री बंदीच्या काळातील परिस्थिती व आजची गावाची परिस्थिती बघता दारूमुक्त गाव असणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांना कळले. चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारूविक्रीवर उपाययोजना करण्यासाठी गावकरी, महिला व पोलिस पाटील यांनी संयुक्तरीत्या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. दारूबंदीसंदर्भात लोकांच्या अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. गावात छुप्या मार्गाने सुरू असलेली दारूविक्री बंद करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

अवश्य वाचा :  तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा

गावातील दारूविक्रेत्यांना दिली समज

दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी गाव संघटना पुनर्गठित करून दारूमुक्त गाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील दारूविक्रेत्यांना समज देऊन दारूविक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक नीलम हरिणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर, शिवणी खुर्दचे पोलिस पाटील पंढरी टेंभुर्णे, मोहझरी येथील पोलिस पाटील तुळशीदास वाढई,माजी उपसरपंच रवींद्र सहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव गुरनुले, सुधाकर निकुरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

गुजरी झाली तंबाखूमुक्त

कोरची स्थानिक नगरपंचायत, पोलिस विभाग व मुक्तिपथ यांच्या संयुक्त प्रयत्नाने बुधवारी भरणाऱ्या भाजीपाल्याच्या गुजरीतील तंबाखूविक्री पूर्णतः बंद आहे. शासनाच्या नियमांचे पालन करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनीसुद्धा दुसरा व्यवसाय निवडला आहे. त्यामुळे तालुका मुख्यालयातील भाजीपाला गुजरी तंबाखूविक्री मुक्त आहे.

जाणून घ्या :  गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा; राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलनांच्या 5 माजी अध्यक्षांचे शासनाला आवाहन

दारूविक्री बंदी व कोरोनासंदर्भात जनजागृती

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने आठवडी बाजार बंद केले. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करीत शहरात गुजरी भरविल जात होती. सुरुवातीला इतर साहित्य विक्रीच्या आड खर्रा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पूर्णतः तंबाखूविक्री बंद करण्यासाठी नगरपंचायत, पोलिस विभाग व मुक्तिपथने संयुक्तरीत्या तंबाखूविक्री, दारूविक्री बंदी व कोरोनासंदर्भात जनजागृती केली.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)