आउटगोईंग रोखण्यासाठी कॉंग्रेसची झाकली मूठ 

राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - कॉंग्रेस पक्षातील "लोकशाही' सर्वश्रुत आहे. गांधी परिवाराला सोडून येथे कुणाशीही पंगा घेता येतो. येथे कोण केव्हा बंड पुकारेल याचा नेम नाही. बंडखोर उमेदवार नंतर येथे अधिकृतसुद्धा होतो. हा सर्व इतिहास लक्षात घेता महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांचे आउटगोईंग रोखण्यासाठी कॉंग्रेस अखेरच्या दिवशी उमेदवार जाहीर करणार आहे. तोपर्यंत सर्वच इच्छुकांकडून प्रचाराची पहिली फेरी आटोपून घेतली जात आहे. सोबतच "बाहेर'चा विचार करणाऱ्यांची गोचीही केली आहे. 

महापालिकेच्या दीडशे जागांसाठी कॉंग्रेसच्या सुमारे दोन हजार इच्छुकांनी रिंगणात उडी घेतली आहे. प्रत्येकालाच उमेदवारी हवी आहे. याशिवाय काही बड्या नेत्यांनी समर्थकांच्या उमेदवारीसाठी बाह्या सरसावल्या आहेत. जागांची मर्यादा लक्षात घेता प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्‍य नाही. मात्र, कार्यकर्ते पक्षातच राहून त्यांनी पक्षाचा प्रचार केला पाहिजे तसेच त्यांनी बंडखोरी करून दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊ नये, याकरिता कॉंग्रेसने इच्छुकांची चांगलीच गोची केली आहे. ज्या इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केला आहे त्यांना प्रभागात कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला लावल्या. सर्वांना एकत्रित फोटोसह पत्रके छापायला लावली. कॉंग्रेसचा प्रचार करणारे आणि भाजपवर टीका करणारे पत्रक सामूहिकपणे वाटायला लावले आहे. मतदारांनी उमेदवार कोण? अशी विचारणा केल्यास फक्त पंजाकडे लक्ष ठेवा उमेदवार आमच्यापैकी कोणीही राहील, असेही असे सांगायला लावले. 

तुमच्यातूनच चार उमेदवार निवडले जातील. बाहेरचा कोणी लादला जाणार नाही असे आश्‍वासनही त्यांना देण्यात आले आहे. फक्त उमेदवारांची नावे शेवटच्या दिवशी म्हणजेच तीन फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहे. उमेदवारीचे गाजर दाखवून सगळ्यांना आश्‍वस्त केले आहे. यामुळे कार्यकर्ते सामूहिकपणे कामाला लागले आहेत. प्रचारही धडाक्‍यात सुरू केला आहे. यामुळे कुठल्याही मतभेदाशिवाय घरोघरी कॉंग्रेसचा पंजा पोहोचू लागला आहे. यामाध्यमातून प्रचाराची पहिली फेरीसुद्धा आटोपून घेतली. 

शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म 
उमेदवारी सादर करायच्या अखेरच्या दिवशीच एबी फॉर्म दिला जाणार असल्याने निवडणुकीची खुमखुमी असणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. एखाद्या बहाद्दराने दुसऱ्या पक्षासोबत आधीच सेटिंग करून ठेवल्यास मतदारांसमोर आधी पंजा घेऊन गेल्याने पुन्हा दुसरे चिन्ह घेऊन कसे जायचे, असा प्रश्‍न त्याच्यासमोर निर्माण होणार आहे. शेवटच्या दिवशी आपल्या समर्थकांसाठी एबी फॉर्म पळवणाऱ्या नेत्यांचाही बंदोबस्त कॉंग्रेसने केला आहे. 

Web Title: Outgoing handle cover to prevent Congress