'समृद्धी'ला समांतर 'हायस्पीड रेल्वे' मार्ग; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात महापालिका, महावितरणच्या विविध कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते पार पडले. याशिवाय महामेट्रो, रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांच्यात तसेच वेकोली व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार समारंभ पार पडला.

नागपूर - नागपूर-मुंबई या 'समृद्धी' मार्गाला समांतर असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. त्यामुळे आता नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी समृद्धी मार्गाला समांतर रेल्वेसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर आजच यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे याच कार्यक्रमात सांगितले होते. 

रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात महापालिका, महावितरणच्या विविध कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते पार पडले. याशिवाय महामेट्रो, रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांच्यात तसेच वेकोली व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार समारंभ पार पडला. या समारंभात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मुख्य अतिथी म्हणून तर केंद्रीय रेल्वे व कोळसामंत्री पियूष गोयल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह सर्व आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, रेल्वे, महामेट्रो, महावितरण, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी प्रकल्पाला लागून हायस्पीड रेल्वेची राज्य सरकारची इच्छा होती. परंतु निधीमुळे हात आखडता घेतला होता, असे सांगितले.

मात्र, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वतःच भाषणातून प्रस्ताव पुढे केल्याने या प्रकल्पासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे ते म्हणाले, वेकोलीच्या पाच खाणीतून पाईप कन्व्हेयरद्वारे थेट औष्णिक उर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविण्यात येणार असल्याने प्रदूषणात घट होईलच, शिवाय वीज निर्मितीसाठी चांगला कोळसा निर्माण होणार असून त्यामुळे वीज निर्मितीच्या खर्चातही घट होऊन नागरिकांना कमी दरात वीज मिळेल. भांडेवाडी येथे कचऱ्यातून वीजनिर्मितीमुळे दीड वर्षात येथील नागरिक दुर्गंधीमुक्त होतील, असेही ते म्हणाले. नागपुरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर प्रकल्प आर्थिक उत्पन्नाचा उत्तम मॉडेल असून शुद्ध पाण्याची बचतही होईल, असेही त्यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parallel High Speed Railway route to Samrudhi CM Devendra Fadnavis announcement