नक्षलवादी असल्याचे सांगून ते सर्रास लुटायचे प्रवाशांना! नेमके ते होते कोण?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

हे तिघे व आणखी काही जण कोरची तालुक्‍यातील वेगवेगळ्या मार्गावर रात्री उभे राहून ट्रकचालक व इतर वाहनधारकांना अडवून आणि आपण नक्षली असल्याचे सांगून कुऱ्हाडीच्या धाकाने पैसे वसूल करीत होते.

कोरची (जि. गडचिरोली) : सामान्य नागरिकांच्या मनात नक्षलवाद्यांविषयी दहशत असते. त्यांच्या या दहशतीचा फायदा काही लुटारूंनी घेतला आणि आपण नक्षलवादी असल्याचे सांगून कुऱ्हाडीचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणे सुरू केले. या तिघा लुटारूंना कोरची पोलिसांनी अटक केली आहे. वसनलाल धुलाराम मडावी (रा. कोटरा) दप्यारे झाडुराम हलामी व श्रीराम दामेसाय मडावी (दोघेही रा. सोनपूर, ता.कोरची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे तिघे व आणखी काही जण कोरची तालुक्‍यातील वेगवेगळ्या मार्गावर रात्री उभे राहून ट्रकचालक व इतर वाहनधारकांना अडवून आणि आपण नक्षली असल्याचे सांगून कुऱ्हाडीच्या धाकाने पैसे वसूल करीत होते.

या टोळीने बेळगाव घाटात बस व ट्रक अडवून नागरिकांकडून पैसे लुटले. नाडेकल फाट्यावरही काही प्रवाशांकडून त्यांनी जबरीने वसुली केली. दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपींनी बोटेकसा रस्त्यावर एक ट्रक अडवून चालकाकडून तसेच अन्य नागरिकांकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यातील तिघांपैकी दोन जण फरार झाले. मात्र, ट्रकचालक व काही नागरिकांनी एका अनोळखी इसमास पकडून कोरची पोलिसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वाचा - तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्राची छवी राजावत कुठे राहते...

त्यानंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी व नितेश पोटे घटनेचा तपास करीत आहेत.  

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers were robbed out of fear of the ax