गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालणारा देवदूत सापडेल का?

मुनेश्‍वर कुकडे
Tuesday, 22 September 2020

कोरोना योद्धा, रुग्णाला जीवनदान देणारा देव, असे ज्याला समजले जाते, तेच डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित रुग्णांच्या औषधोपचारात निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. ऑक्‍सिजनची गरज असूनही कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवत नाहीत.

गोंदिया : ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असताना रुग्णांना ऑक्‍सिजन न देणे, कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचारात हलगर्जीपणा होणे, रुग्णांची हेळसांड करणे हा प्रकार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे. या प्रकारावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गोंदिया शहरच नव्हे, तर जिल्ह्याचा कानाकोपरा कोरोना विषाणूने कवेत घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंतादेखील वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज तीन आकडी बाधित रुग्णांची संख्या पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील बेड रुग्णांच्या संख्येने हाउसफुल्ल झाल्याचे बोलले जाते. बेड उपलब्ध करून देण्यात यावे, नगर परिषद हद्दीतील समाजभवन, हॉल, लॉन नगर परिषदेने ताब्यात घेऊन तिथे रुग्णांची सोय करावी, अशी मागणी होत आहे. यावरून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात येते.

रविवारपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५६२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. १६६४ इतके क्रियाशील रुग्ण असून, रविवारपर्यंत ६६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

जाणून घ्या  : रात्री शांत झोप लागत नाही? मग हे उपाय करा आणि घ्या 'चैन की निंद'

रुग्णांच्या औषधोपचारात निष्काळजीपणा

दरम्यान, कोरोना योद्धा, रुग्णाला जीवनदान देणारा देव, असे ज्याला समजले जाते, तेच डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित रुग्णांच्या औषधोपचारात निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. ऑक्‍सिजनची गरज असूनही कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवत नाहीत. त्यांच्या प्रकृतीकडे पाहातसुद्धा नाहीत, असा आरोपही होत आहे.

रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ

उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असताना गरजू रुग्णांना ऑक्‍सिजन का दिले जात नाही? हा प्रश्‍न आहे. इतकेच नाही, तर रुग्णांवर वेळेत औषधोपचार केले जात नाही. त्यामुळे रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. तिरोडा तालुक्‍यातील एका रुग्ण महिलेला गरज असताना ऑक्‍सिजन दिला गेला नाही. त्यामुळे तिला जीव गमवावा लागल्याची चर्चा सोशल मीडियात असून, अनेकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, अखेर माणुसकीला जागली खाकी

ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा
रुग्णालयात ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गरजू रुग्णांना ऑक्‍सिजन दिले जाते. ऑक्‍सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाला असावा, असे वाटत नाही. दुसऱ्या कोण्या आजाराने मृत्यू झाला असावा.
- डॉ. रूखमोडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patients are not getting oxygen in Gondia district