मूलच्या पुरस्कारप्राप्त रुग्णालयातील रुग्ण राहतात अर्धपोटी

विनायक रेकलवार
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मूल (जि. चंद्रपूर) : उत्कृष्ट रुग्णसेवा दिल्याबद्दल येथील उपजिल्हा रुग्णालयाला पुरस्कार मिळाला. मात्र, या पुरस्कारप्राप्त रुग्णालयात रुग्णांच्या जेवणात कंजूसी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात रुग्णांना कमी जेवण मिळत आहे. रुग्णालयातील जेवणामुळे आमचे पोटच भरत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. उलट नियमानुसार रुग्णांना जेवण दिले जात असल्याचे रुग्णालय व्यवस्थापन आणि कंत्राटदाराने स्पष्ट केले आहे.

मूल आणि तालुक्‍याची गरज लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. तीस खाटांऐवजी वाढीव पन्नास खाटांची उभारणी करण्यात आली. पुन्हा वाढीव पन्नास खाटांची मागणी करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडला आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या दररोज पन्नास ते साठ रुग्ण भरती असतात. वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तापाची साथ आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर भरती आहेत. शासकीय नियमानुसार भरती असलेल्या रुग्णाला मोफत जेवण मिळते. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकाला घरून जेवणाचा डब्बा बोलवावा लागतो. असे असले तरी, उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला मिळणारे जेवण अतिशय अल्प असल्याची रुग्णांची तक्रार आहे. या जेवणामुळे आमचे पोट भरत नाही, असे रुग्णांचे म्हणणे आहे. दोन लहान पोळ्या, थोडासा भात, थोडसे दाळीचे वरण आणि भाजी दिली जात असल्याचे रुग्ण सांगतात. सकाळी नाश्‍त्यासाठी चमचाभर उसळ दिली जाते. जेवणाचा दर्जाही फारसा चांगला नसल्याचे रुग्ण सांगतात. एखादी पोळी जास्तीची मागितली तरी ती दिली जात नाही. अशा जेवणामुळे रुग्ण बरा होण्यापेक्षा अधिक अशक्त होईल, असे नातेवाईक म्हणतात. याला कोणते पोषक आहार म्हणायचे, असा सवाल नातेवाईक करीत आहेत.
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाविषयी प्रमाण ठरले आहे. शासकीय नियमानुसारच जेवण दिले जाते. जास्त जेवणापेक्षा त्यातील पोषक घटक आणि प्रथिने महत्त्वाची असतात. तरीसुद्धा कंत्राटदाराला समज देऊन योग्य आणि प्रमाणात जेवण मिळण्याविषयी प्रयत्न करतो.
डॉ. बाबर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मूल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients in the award-winning hospital stay on fast