खवले मांजरांची जमात धोक्‍यात...वाचा कारण

राजेश रामपूरकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

खवले मांजर (पॅंगोलिन), कासव, शार्क माशांचे कल्ले यांनी ही जागा व्यापली आहे. हे प्राणी भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत परिशिष्ट एकमध्ये आहे. त्यांची शिकार आणि व्यापार हे पूर्णत: बेकायदेशीर आहे.

नागपूर : वन्यजीवांच्या तस्करीत एकेकाळी वाघ तसेच हत्ती या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जायचे. त्यावर निर्बंध आणल्याने आता खवल्या मांजराची तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर हत्या होत असल्याचे आढळून आले आहे. वनविभागाने गेल्या काही दिवसांत कारवाई करून खवले मांजर व आरोपी ताब्यात घेतले. आरोपी मध्य प्रदेशातील असल्याने आंतरराज्य तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून या वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराच्या वाढत्या विस्तारावर चर्चा सुरू झाली.

कधीकाळी वन्यजीवांशी संबंधित शिकार आणि व्यापाराचे गुन्हे हे केवळ वाघांभोवतीच केंद्रित झालेले होते. वनपर्यटन म्हणजे वाघ पाहणे तसेच वन्यप्राण्यांची शिकार-व्यापार म्हणजे वाघ, वाघाची कातडी, नखापर्यंत मर्यादित होते. दक्षिण भारतात हस्तिदंताच्या तस्करीने धुमाकूळ होता. पण, गेल्या दहा वर्षांत हे चित्र बदलले. व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र शीघ्र कृती दल आणि बऱ्याच योजनांमुळे वाघांच्या शिकारीला चांगलाच आळा बसल्याचे वाघांच्या वाढत्या संख्येमुळे उघड झाले. पण, त्याच वेळी खवले मांजर (पॅंगोलिन), कासव, शार्क माशांचे कल्ले यांनी ही जागा व्यापली आहे. हे प्राणी भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत परिशिष्ट एकमध्ये आहे. त्यांची शिकार आणि व्यापार हे पूर्णत: बेकायदेशीर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात काम करणारी "ट्रॅफिक' संस्था अनेक देशांमधील वन्यजीव तस्करीची माहिती गोळा करीत आहे. त्यांनी जाहीर केलेल्या अहवालातून भारतातील खवले मांजरांच्या शिकारीची अतिशय धक्कादायक माहिती मिळते. "ट्रॅफिक'ने भारतात झालेल्या खवले मांजरांच्या खवल्यांच्या जप्तीच्या घटनांचा अभ्यास केला. त्यात गेल्या दहा वर्षांत एक लाख खवले मांजरांची शिकार झाली, असा अहवाल प्रकाशित केला. 20 टन खवल्या मांजराची दरवर्षी तस्करी होत आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये सर्वाधिक मागणी खवल्या मांजराला आहे. यंत्रणांना गुंगारा देऊन देशाबाहेर किती खवले मांजर पाठवली गेली आहेत याची आकडेवारी पुढे आलेली नाही.

खवले मांजरांच्या खवल्यांच्या पावडरचा वापर औषधासाठी केला जातो. त्यामुळे या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चीनमध्ये याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याचे समजते. एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात. हा सर्वच व्यापार बेकायदेशीर असल्याने त्याची खरी आकडेवारी कळत नाही. "ट्रॅफिक'ने प्रकाशित केलेल्या अहवालात प्रौढ खवले मांजराच्या खवल्यांचे वजन एक किलो असते, असा उल्लेख आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल करण्यात येत असल्याची माहिती आहे. चीन आण व्हिएतनाम या देशात मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची तस्करी होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
 

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी
दहा वर्षांपूर्वी खवले मांजरांचा व्यापार नव्हता. वाघाच्या शिकारीवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लावण्यास सरकारला यश आले. त्यामुळे वाघांची शिकार करणारी टोळी या शिकारीकडे वळली. आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्यापासून वस्त्र तयार करण्याचा कल वाढल्याने मागणी वाढली. परिणामी खवले मांजराची तस्करी वाढली आहे.
गिरीश वशिष्ट, सेवानिवृत्त वनाधिकारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pengolin community is in danger