बोअरवेल आहे पण त्याला पाणीच नाही,पाणी समस्येने घेतलेय विक्राळ रूप

यशवंत शेंडे
Tuesday, 5 May 2020

प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली तर नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागणार नाही. कहाली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या बोअरवेल, विहिरींचे पाणी आटल्यामुळे येथील नागरिकांना रात्री-बेरात्री अर्धा ते एक तास बोअरवेलवर उभे राहावे लागते.

सालेकसा (जि. गोंदिया) : तालुक्‍यात दरवर्षी उन्हाळा आला की पाणीसमस्या निर्माण होत असते. मात्र, तालुका प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. सालेकसा तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील असून जंगल व पहाडाने व्यापला आहे. अनेक गावांत बोअरवेल बंद पडल्या असून पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनातर्फे पाणीटंचाईची माहिती कागदोपत्री मागून नोंद केली जाते. मात्र, प्रत्यक्षात विहीर अधिग्रहण केले जात नाही. तालुक्‍यात चाळीस ग्रामपंचायती असून त्यात 92 गावांचा समावेश आहे. सर्वाधिक पाणी समस्या निंबा, कहाली, खडखडी टोला, दुर्गुटोला, गोंडीटोला, भाडीपार, मकाटोला, वारकरी टोला, सोनपुरी, इसनाटोला आदी विविध गावांत निर्माण झाली आहे, निंबा येथील बोअरवेल बंद असल्यामुळे एका खासगी पंपधारकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली तर नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागणार नाही. कहाली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या बोअरवेल, विहिरींचे पाणी आटल्यामुळे येथील नागरिकांना रात्री-बेरात्री अर्धा ते एक तास बोअरवेलवर उभे राहावे लागते. भरउन्हात लहान मुलाबाळांना घेऊन कसेतरी ते आपली तहान भागवतात. त्यामुळे प्रशासनाने जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी समस्या होणार नाही. मात्र, प्रशासन एप्रिल-मे महिन्यात पाणीपुरवठा आराखड्याचे नियोजन करीत असल्याने नागरिकांना पाणीसमस्येचा सामना करावा लागत आहे. तालुक्‍यात जवळपास 164 ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने 2018, 2019 मध्ये 7 लाख 2 हजार 740 रुपयांच्या पाणीपुरवठा आराखड्याला मान्यता दिली होती. मात्र, आतापर्यंत याचे नियोजन करण्यात आले नाही. तसेच पाणीपुरवठ्याचा निधीही खर्च केला जात नाही. त्यामुळे शासनाने पाणीटंचाई आराखड्याचे दोन ते तीन महिन्यांपूर्वी नियोजन करावे व भरउन्हाळ्यात पाणीसमस्या उद्‌भवणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी तालुक्‍यातील नागरिकांनी केली आहे.

सविस्तर वाचा - ...अन कामगारांच्या चेह-यावर परतले हसू
बोअरवेलची मागणी
सालेकसा तालुक्‍यात निंबा व कहाली ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यासंबंधी आराखडा तयार केला आहे. यासाठी 1000 बोअरवेल पाइपची मागणी केली आहे. लवकरच नागरिकांना पाणी मिळेल.
 एस. टी. तुरकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सालेकसा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People facing water shortage in Gondia District