
प्रसूतीसाठी पुरातून जीवघेणा प्रवास...
गोंडपिपरी/धाबा (जि. चंद्रपूर) : प्रसूतीची तारीख आली अन् कुटुंबीयांची चिंता वाढली. तीन दिवसांपासून सततचा पूर व रस्तेबंद असल्याने आता काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला. शेवटी जीव संकटात टाकत गर्भवतीला घेऊन आशा सेविकेने होडीने प्रवास केला. वेडगाव-सकमूर या मार्गावरून पावसाच्या यातना दाखविणारा हा प्रकार समोर आला. नवीन पोडसा (ता. गोंडपिपरी) येथील पिंकू सुनील सातपुते या गर्भवती आहेत. त्यांना प्रसूतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रुग्णालयात भरती व्हायचे होते. पण, तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. गोंडपिपरीला जाण्याचे रस्तेही बंद होते. वेडगाव-सकमूर या मार्गाला बेटाचे स्वरूप आले. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न होता.
महिलेची अवस्था व गंभीरता लक्षात घेता शेवटी एक नावाडी तयार झाला. पिंकू सातपुते हिच्यासह आशासेविका संगीता ठाकूर, कुटुंबातील सदस्य होडीतून निघाले. वेडगाव ते सकमूरपर्यंत होडीने प्रवास करीत त्या शेवटी गोंडपिपरीला पोहोचल्या आणि कुटुंबीयांच्या जिवात जीव आला. वेडगावच्या आरोग्यसेविका मीना टिकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पिंकू सातपुते हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य हलविले आहे.
आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष
सीमावर्ती भागातील वेडगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. पण, अनेक वर्षांपासून इथे वैद्यकीय अधिकारी नाही. कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने या ठिकाणी प्राथमिक उपचार मिळणे कठीण आहे. ही बाब माहीत असूनही लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे वारंवार दुर्लक्षच केले आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे.