
शेतकरी अडथळ्यांची शर्यत नेहमीच पार करीत आले आहेत. त्यानंतरही संकटांनी शेतकऱ्यांचा पाठलाग सोडलाच नाही. गेल्या पाच वर्षांत तर अनेक संकटात शेतकरी सापडलेत. त्यातूनही शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती, ओला व कोरडा दुष्काळ, 2017मध्ये गुलाबी बोंडअळी, तर यंदा कोरोनाच्या संकटात शेतकरी सापडले आहेत. त्यानंतर पुन्हा गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत बोंडअळीची संख्या आर्थिक नुकसान परिस्थितीच्याही वर गेलेली आहे. शिवाय अवकाळी पावसाने कपाशीवर बोंडअळी दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीननंतर कपाशी पीकदेखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
शेतकरी अडथळ्यांची शर्यत नेहमीच पार करीत आले आहेत. त्यानंतरही संकटांनी शेतकऱ्यांचा पाठलाग सोडलाच नाही. गेल्या पाच वर्षांत तर अनेक संकटात शेतकरी सापडलेत. त्यातूनही शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर गेल्या तीन वर्षांपासून फवारणीतून विषबाधा, गुलाबी बोंडअळी, त्यानंतर आता कोरोनाचे संकट घोंघावत आहे. गेल्या 2017मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना गारद केले. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांपासून याला 'ब्रेक' लागला आहे. बोंडअळी तयार होण्याची साखळी खंडित करण्यात आली होती. मात्र, यंदा पुन्हा एकदा बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक होता.
हेही वाचा - आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास नको रे बाबा, रस्त्याच्या दूरवस्थेमुळे वाढले अपघाताचे...
जिनिंगमध्ये कापसाची आवक वाढल्याने ढीग होत आहेत. या ठिकाणी कामगंद सापळे किंवा लाइट ट्रॅप लावणे आवश्यक आहे. मात्र, या बाबींची खबरदारी घेण्यात आलेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील अनेक भागांत बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने खबरदारी घेतली होती. बियाण्यांची विक्री, पेरणीचा कालावधी निश्चित करून दिला होता. मात्र, त्यानंतरही पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर बोंडअळीचे संकट ओढवले आहे. सद्यस्थितीत कापसाची बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी वेचणी सुरू झालेली आहे. गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या पिढीपर्यंत नियंत्रण करण्यात यशस्वी झाले, तरी अळ्यांची संख्या ही आर्थिक नुकसान परिस्थितीच्याही वर गेलेली आहे. कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ते निर्देशनास आले आहे. जिल्ह्यातील नेर, कळंब, राळेगाव, पांढरकवडा, झरी जामणी आदी तालुक्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही भागांत 25 ते 35 टक्के, तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव असल्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राने व्यक्त केली आहे. याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात आलेल्या पावसाने कपाशीवर बोंडसळ दिसून येत आहे. कपाशीवर आलेल्या दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
हेही वाचा - पुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित
कामगंध सापळे दिसेना -
बोंडअळीवर आळा घालण्यासाठी कामगंध सापळे अत्यंत महत्वाचे आहेत. शासनाने ते शेतकऱ्यांना मोफत वाटायला हवे होते. परंतु, यंदा तशा पद्धतीचे नियोजन झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे बहुतांश शेतांमध्ये कामगंध सापळ्यांचा अभावच दिसून येत आहे.
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकरी किमान दोन कामगंध सापळे लावावेत. एकरी 20 बोंड टिचवून त्यामधील कीडक बोंडे व अळ्यांची संख्या मोजावी. प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून ट्रायझोफॉस 35 टक्के, डेल्हामेथ्रीन एक टक्के, क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के, लॅब्डासाहॅलोथ्रीन 4.6 टक्के, क्लोरपपायरीफॉस 50 टक्के, सायपरमेथ्रीन पाच टक्के, किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.