गणरायांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न!

सतीश दहाट : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कामठी ः भक्तांना आस लागलेल्या गौरी-गणतीचे दिवस जवळ आलेले आहेत. येत्या सोमवारपासून गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु, गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या मिरवणुकीला खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागणार असल्याने सर्वच खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

कामठी ः भक्तांना आस लागलेल्या गौरी-गणतीचे दिवस जवळ आलेले आहेत. येत्या सोमवारपासून गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु, गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या मिरवणुकीला खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागणार असल्याने सर्वच खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

कामठी शहरासह ग्रामीण भागात शंभराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शिवाय घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. त्याची तयारी सुरू झाली असून गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र नगरपालिका प्रशासन तथा सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन अजूनही सुस्त असल्याचे चित्र खड्ड्यांकडे पाहिल्यावर होते. शहरासह ग्रामीण भागातील काही रस्ते वगळता अनेक रस्त्यांवर खड्‌डे पडलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. शहरातील गिरिजाघर, हनुमान मंदिर, येरखेडा रोड, जयस्तंभ चौक, दुर्गा चौक, मोंढा, खलाशी लाइन येथे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील काही भागांत रस्त्यावरील खड्डे जसेच्या तसे आहेत. त्यामुळे त्या भागातील अथवा त्या मार्गाने जाणारी गणरायांची मिरवणूक खड्ड्यांमधून जाणार असल्याची ओरड होत आहे. शुक्रवारला नवीन कामठी येथे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांनी याबाबतचा मुद्दा उचलून धरला होती. वर्षभर सुस्त असलेल्या प्रशासनाने विधानसभा पुढे असल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याची कामे काढल्याने याचा फटकाही नागरिकांना बसत आहे.
अपघाताची शक्‍यता वाढली
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत शहरासह ग्रामीण भागात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ग्रामस्थ दर्शनासह देखावे पाहण्यासाठी फिरतात. प्रत्येक मार्गावर वाहनांची वर्दळ असते परंतु रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याने याचा नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्याने वाढणारी वर्दळ लक्षात घेता रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits are obstructed by the arrival of Ganarai!