प्लॅस्टीक बंदीसाठी खामगाव नगरपालिका सज्ज 

सिध्दांत उंबरकार
शनिवार, 23 जून 2018

या वस्तूंच्या प्लॅस्टिक पॅकिंगवर बंदी नाही
दूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लॅस्टिक 

खामगाव : राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली असून, खामगाव नगरपालिका सुध्दा त्यासाठी सज्ज आहे. प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापराला आळा बसावा याकरिता शहरात देखरेख व कारवाईसाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्यांवर या पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

प्लॅस्टिक नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लॅस्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे. शनिवार, २३ जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिकबंदी लागू होत आहे. तशा सूचना संबंधित विभागांना व राज्यातील नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत.

खामगाव नगरपालिकेत सुध्दा प्लॅस्टिक बंदीबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. खामगाव नगर पालिकेच्या वतीने पथकाची स्थापना करण्यात आली असून, या पथकाच्या माध्यमातून शहरात प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. प्लॅस्टिकचा वापर करताना कोणी आढळून आल्यास पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यानंतर जर पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी आढळली तर तात्काळ ५ हजार रूपये दंड आकारला जाईल तसेच तीन वर्षाचा तुरूंगवास होवू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे. 

प्लॅस्टीकमुळे पर्यावरणास मोठा धोका आहे. प्लॅस्टीक कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टीकचा वापर टाळावा. विक्रेते व नागरिक प्लॅस्टीकचा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे. 
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी. 

बंदीबाबत संभ्रम कायम
प्लॅस्टिकबंदी बाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने कोणत्या पध्दतीचा प्लास्टिक वापर चालेल किंवा कोणते प्लॅस्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल यासंदर्भात अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. प्लॅस्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतील, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील अशा पध्दतीचेही संदेश सोशल नेटवर्किंगवरून फिरत असल्याने आणि सुरूवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरित्या चुकीचे न ठरवल्याने संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. 

या वस्तूंच्या प्लॅस्टिक पॅकिंगवर बंदी नाही
दूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लॅस्टिक 

प्लॅस्टिक बंदीवर अशी होणार कारवाई
- पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी आढळली तर त्याला पिशवीसकट स्थानिक पोलिस स्टेशनला नेऊन, तत्काळ ५ हजार रूपये दंड आकारला जाईल. 
- पुन्हा त्याच व्यक्तीकडे प्लॅस्टिक पिशवी आढळली तर १० हजार दंड आकारला जाईल. 
- तिसऱ्या वेळी त्याच व्यक्तीकडे प्लॅस्टिकची पिशवी आढळली तर त्या व्यक्तीला २५ हजार रूपये दंड. 
- तीन महिन्यांची शिक्षा देखील होऊ शकते. 

Web Title: plastic ban implement in Khamgaon