
झाडीपट्टी नाट्यमंडळाची परंपरा 150 वर्षांपासून चालत आली आहे. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी नाट्य परंपरा ही जिल्ह्यात आजही सुरू असून, कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाने लॉकडाउन व अनलॉक काळात आठ महिन्यांपासून रंगमंचाचे पडदे बंद पडले होते.
सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : गेल्या आठ महिन्यांपासून रंगमंचाचे पडदे बंद होते. शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून रंगमंचाचे पडदे उघडण्यास परवानगी दिली. आता पडदे उघडले. मात्र, अजूनही गावखेड्यात काम मिळत नसल्याने झाडीपट्टीतील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - कायदा कसा असावा हे पत्रात नमूद नव्हतेच, वाचा शरद पवारांच्या पत्राबद्दल काय म्हणाले...
तालुक्यात झाडीपट्टी नाट्यमंडळाची परंपरा 150 वर्षांपासून चालत आली आहे. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी नाट्य परंपरा ही जिल्ह्यात आजही सुरू असून, कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाने लॉकडाउन व अनलॉक काळात आठ महिन्यांपासून रंगमंचाचे पडदे बंद पडले होते. त्यामुळे नाट्य कलावंतांचा रोजगार हिरावला गेला. या कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला होता. दरम्यान, शासनाने रंगमंचाचे पडदे उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी झाडीपट्टी नाट्य मंडळाच्या शिष्टमंडळाने केली होती. यासाठी नाट्य मंडळांनी मुंबई मंत्रालयात धाव घेतली होती.
हेही वाचा - ८३८ गावांना गडचिरोली जिल्ह्यात हवी कायम दारूबंदी
शासनाने दिवाळीनंतर नाटकाचे पडदे उघडण्याची परवानगी दिली. मात्र, अजूनही गावखेड्यातील नाट्य मंडळाची नाटक, दंडार, तमाशा, गोंधळ सुरू झाले नाहीत. फक्त व्यावसायिक रंगभूमीची नाटके काही प्रमाणात सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील जवळपास 2 हजार कलावंत दिवाळीनंतर मंडईनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, जनजागृती, मनोरंजन करून पिढ्यान्पिढ्यांपासून चालत आलेली आपली कला सादर करतात. यातून लोकांचे मनोरंजन होत असते. ग्रामीण भागातील या कलावंतांचे हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. कित्येकांचे संसार उघड्यावर येण्याच्या मार्गावर आहेत.
हेही वाचा - कंत्राटदार-ग्रामपंचायत प्रशासनाच्या बिलासाठी चकरा, आता तरी पाणीटंचाईचा निधी मिळेल का?
झाडीपट्टीतल्या दादा कोंडके यांनीही व्यक्त केली खंत -
दिवाळीनंतर भाऊबीज, मंडईनिमित्त होणारे कार्यक्रम एप्रिल, मे महिन्यापर्यंत चालत असतात. सद्यःस्थितीत पूर्ववत होणारे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. मात्र, आजही गावखेड्यात नाटक, दंडार, तमाशा, गोंधळ पूर्ववत सुरू झाले नाहीत. फक्त व्यावसायिक रंगभूमीची नाटके सुरू झालेली दिसून येत आहेत, अशी खंत नाट्यकलावंत व झाडीपट्टीचे दादा कोंडके म्हणून ओळख असलेले कोसमतोंडी येथील किसनलाल टेंभरे यांनी व्यक्त केली आहे. किसनलाल टेंभरे यांनी अनेक नाटकांत व दंडारीमध्ये विनोदी भूमिका साकारून लोकांची मने जिंकली आहेत.