मतदानाचा हक्क बजवा, सवलत मिळवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनात 10 ते 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनात 10 ते 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मतदानानंतर म्हणजेच 21 ऑक्‍टोबरनंतर पुढील 15 दिवस ही सवलत राहील. यासाठी मतदारांना आपला मतदानाचा पुरावा म्हणून आपले शाई लावलेले बोट दाखविणे आवश्‍यक आहे. ही सवलत केवळ मतदान केलेल्या मतदारांसाठीच राहील. पेंच परिसरातील महत्त्वाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिल्लारी येथील रिसॉर्ट, सिल्लारी येथील अमलतास, पिपरिया येथील गो फ्लेमिंगो रिसॉर्ट, सृष्टी जंगल होम सिल्लारी, तुली, वीरबाग, (बांद्रा) टायगर कॉरिडॉर (पेंच), खुर्सापार, ऑलिव्ह व्हिला, पेंच, ऑलिव्ह रिसॉर्ट, खिंडसी व राजकमल बोटिंग सेंटर, खिंडसी, रामधाम, मनसर तसेच कर्माझरी येथील ऑलिव्ह व्हिला येथे 21 ऑक्‍टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून 15 दिवस पर्यटकांना जेवणावर 10 ते 20 टक्के तसेच राहण्यावर 10 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत मिळेल.
जिल्हा प्रशासन व रामटेक उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने रामटेक परिसरातील महत्त्वाच्या हॉटेल्स व रिसॉर्ट चालकांची बैठक रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मतदार जागृती अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेंच परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेल येथे मतदानानंतर पुढील 15 दिवस 10 ते 25 टक्के पर्यटकांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकशाही प्रक्रियेत मतदान महत्त्वाचे आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही सवलत आहे. जातीस्त जास्त मतदार याचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.
-जोगेंद्र कट्यारे, उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी, रामटेक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Play the right to vote, get a discount