स्वप्न विकणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध कवितेतून उठाव करावा

विजयकुमार राऊत ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर ः माणसाचा रानटी मेंदू, त्याच्या तसल्याच रानटी चकमकी, ही सारी उत्क्रांती कशी मानायची, असा कडवट प्रश्‍न पडलेली वर्षा ढोके सय्यद यांची कविता "अनागोंदीच्या नोंदी' या द्वितीय कवितासंग्रहातून सर्वसामान्य माणसांची अस्वस्थता प्रगट करते. आमिन सय्यद व वर्षा ढोके या दाम्पत्याच्या "काफिरसुक्‍त' या संयुक्‍त कवितासंग्रहानंतर हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नोंदी घेतलेल्या काळात सगळीकडे राष्ट्रवाद थोपविण्याचा प्रयत्न, स्वप्ने, नीतिमूल्ये आणि विचारही "हायजॅक' करून माणसाला नपुंसक करण्याचे षड्‌यंत्र सुरू असल्याची खंत "भेटी लागी जीवा' या सदरातून कवयित्री वर्षा ढोके सय्यद यांनी मांडली.

 कुठल्या काळाचे प्रतिबिंब "अनागोंदीच्या नोंदी'त आहे?
-गेल्या काही वर्षांपासून समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब जरी प्रत्येक कवितेतून उमटले, तरी त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने वारंवार घडत असल्याचे दिसते. समाजात प्रखर आणि सौम्य अशा दोन गटांतून टोकाची संवेदनशीलता वाढीस लागल्याचे चित्र आहे. या घटना किंवा प्रश्‍न केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडताहेत. "लाइटहाउस' या कवितेतून अवतीभवतीच्या क्षेत्रात जातिपातीच्या भेदातून अनुभवास येणारी प्रासंगिकता अस्वस्थ करून जाते.

"राष्ट्रवाद' थोपविल्याचे का वाटते?
-विचार थोपविण्याच्या काळात स्वतःचे विचारच खुंटले जाताहेत. जगणे एक साचेबद्ध स्वरूपात मांडले जात आहे. जागतिक पातळीवरही अशा घटना घडत आहेत. स्वप्न विकणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध कवितेने आवाज उठविणे गरजेचे आहे. "तालिबानी' विचार बुद्धाच्या प्रतिमांना उद्‌ध्वस्त करतात, तेव्हाही आपल्यातला बुद्ध शांतच बसणार का?

कविता यावर "उपाय' शोधते का?
उपाय सांगणे हे कवीचे काम नाही. एका अनामिक अस्वस्थतेतून कवितेत घटनांच्या केवळ नोंदी घेतल्या आहेत. सुंदरतेचे संपूर्ण स्वप्न कदाचित अस्तित्वात येणार नाही; परंतु मला एक कवयित्री म्हणून हे प्रश्‍न दिसतात. मुळात मी एक नागरिक आहे. काही बदल व्हायला हवा, असे मला वाटते. अवतीभवती आपल्या परिने तो घडवून आणण्याचा प्रयत्न मात्र नक्‍की करते. वर्तमानाचा "कोलाज' मांडण्याचा हा हवा तर प्रामाणिक प्रयत्न आहे. तुमच्या प्रश्‍नांवर घाला घालणाऱ्यांविरुद्ध कुणीतरी बोलायला हवे. अन्यायाविरुद्ध गप्प राहायचंच असेल तर कवितेच्या वाटेला कुणी जाऊ नये, हेच खरे. लिहून बदल होतात, हेही मी म्हणणार नाही. मात्र, कुण्या एका "ओऍसिस'च्या प्रतीक्षेत असताना मनाला हे सगळे बदलावयास हवे, असे वाटते. अन्यायाविरुद्ध चकार शब्दही माझ्या तोंडातून निघणार नसतील तर माझ्या कवितेने वांझ राहिलेले बरे.

कवितेतून हे बदल घडताहेत का?
एक संवेदनशील माणूस कालांतराने बदल घडवून आणतो. हे बदल डोळ्यांनी दिसत नाहीत. इथून पुढं लढण्यासारखं काहीच उरत नाही, असं म्हणून गप्प राहणेच मला पसंत नाही. "फिडेल' वाजवीत बसलेली कवयित्री होणे मला आवडणार नाही. मानवांतराविरुद्धचा लढा असा चालूच ठेवायला हवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poetry should be raised against the rulers who sell the dream