Devendra Fadnavis : ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ मग एकाच घरातून का इतके प्रधानमंत्री!

मोदीजी केवळ भाषणं करीत नाही, तर त्यांच्या योजनांचा लाभ हा खर्‍या अर्थाने एससी, एसटी, ओबीसींना मिळाला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

पोहरादेवी- ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री, याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबुसिंगजी महाराज, जितेंद्रजी महाराज, कबीरजी महाराज, यशवंतजी महाराज, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मंत्री अतुल सावे, खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, आशीष देशमुख, संजय गाते, राजेंद्र पाटणी, निलय नाईक, दादाराव केचे, देवराव होळी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंडल आयोगाला विरोध करणारे काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा पक्ष हेच होते. आज एक ओबीसी पंतप्रधान आहे आणि ओबीसींसाठी काम करणारा नेता उभा राहतो, तेव्हा या ओबीसी नेत्याला संपविण्यासाठी 25 पक्ष एकत्र आले. पण, एक सांगतो, ‘जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा’.

मोदीजी केवळ भाषणं करीत नाही, तर त्यांच्या योजनांचा लाभ हा खर्‍या अर्थाने एससी, एसटी, ओबीसींना मिळाला आहे. राहुल गांधी सध्या ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून फिरत आहेत. प्रेम हे दुकानात नाही, तर ते मनात असावे लागते. काँग्रेस प्रेमाचे दुकान काल नागपुरात दिसले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसने आजवर जे मुख्यमंत्री दिले, त्यातील केवळ 17 टक्के ओबीसी होते. तर भाजपाने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील 31 टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1931 नंतर एससी, एसटी वगळता कधीच जाती जनगणना झाली नाही. तत्कालिन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी 7 मे 2011 रोजी संसदेत सांगितले की, आम्ही जाती जनगणना करणार नाही.

हेही सांगितले गेले की, स्वातंत्र्यानंतर नेहरुंच्या काळात एकमताने जाती जनगणना करायची नाही, असे ठरले. आमचा जात जनगणनेला विरोध नाही. पण, 2011 मध्ये जेव्हा केंद्र सरकारवर दबाव आला, तेव्हा झालेल्या एसईसीसीच्या सर्वेक्षणात 5500 जातींची संख्या 46 लाखांवर पोहोचली, तर महाराष्ट्रातील 494 जातींची संख्या 4 लाखांच्या वर गेली.

राज्यात आमचे सरकार आले तेव्हा ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय तयार केले आणि त्याला निधी दिला. आज अनेक योजना या मंत्रालयामार्फत अंमलात आणल्या जात आहेत. 36 वसतीगृह ओबीसींसाठी सुरु होत आहेत. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून ओबीसींसाठी 10 लाख घरांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक ओबीसी समाजघटकासाठी सरकारने काम सुरू केले.

ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम केले. मेडिकलच्या राष्ट्रीय कोट्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली. 13,000 कोटी रुपये त्यासाठी दिले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा, धनगर आरक्षण आम्ही देऊच. प्रत्येक समाजाला त्यांचे अधिकार देऊ. पण, असे करताना कुणाचे ओरबाडून घेणार नाही. काही लोक दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे. पण, तो प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

स्वागतपर भाषण आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.प्रास्ताविक भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी केले.संचलन प्रदेश भाजपा चे सचिव जयंत डेहनकर यांनी केले.

मंदिरात जाऊन दर्शन

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर यांनी प्रथम येथील देवी जगदंबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांचे समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तेथे त्यांचा महाराज मंडळींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com