यवतमाळात विष परीक्षण प्रयोगशाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

यवतमाळ : नापिकी, नैराश्‍य, वाद आदी विविध कारणांमुळे विषाचा घोट घेतला जातो. कोणते विष प्राशन केले, याचे निदान वेळेवर लागत नसल्याने उपचार करताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात विष परीक्षण प्रयोगशाळा (क्‍लिनिकल टॉक्‍सिकॉलॉजी प्रयोगशाळा) सुरू होणार असून, पॉयझन इन्फॉरमेशन सेंटरदेखील राहणार आहे. त्यासाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविण्याचे सत्र सुरूच आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ कुप्रसिद्ध आहे. गेल्या 15 वर्षांत पिकांवर येणाऱ्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर सातत्याने वाढत चालला आहे. आता तर बाजारपेठेत अतिशय घातक कीटकनाशके विक्रीस उपलब्ध आहेत. हे औषध शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होते. नापिकी, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, प्रेमभंग, नैराश्‍य आदी क्षुल्लक कारणांतून मरणाला जवळ करण्यासाठी शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी विषाचा घोट घेतात. वर्षाला दीड ते दोन हजारांच्या घरात विषबाधित रुग्ण येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. गेल्या 2001 ते 2019 या 19 वर्षांच्या दीर्घ कालावधीत पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, तरुणींचा समावेश आहे. 2017 मध्ये फवारणीमुळे 22 शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर शेकडोंना बाधा झाली. विषबाधितांवर तत्काळ उपचार करता यावे, यासाठी विष परीक्षण प्रयोगशाळेचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी शासनाकडे पाठविला होता. दिल्ली येथील एम्सच्या धर्तीवर ही प्रयोगशाळा राहणार आहे.

पालकमंत्री मदन येरावार, तत्कालीन जिल्हाधिकारी व "हाफकीन'चे विद्यमान संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला. क्‍लिनिकल टॉक्‍सीकॉलॉजी प्रयोगशाळेचा पुढील प्रवास सुकर झाला आहे. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा झाल्यास निश्‍चितच विषबाधितांना त्याचा फायदा होईल.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poison Testing Laboratory to be established in yavatmal