esakal | शाब्बास पोलिस दादा, अवघ्या ७२ तासांत लावला चोरीचा छडा! 
sakal

बोलून बातमी शोधा

Tractor Thief

ट्रॅक्‍टर तर मिळाला, पण आरोपी अद्याप हाती आला नव्हता. त्यामुळे या पथकाने तपास सुरूच ठेवत अखेर चोरालाही शोधून काढले. व्यंकटेश लक्ष्मीनारायण सांबारी (वय 29) असे या चोराचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्यातील सुलतानाबाद येथील रहिवासी आहे.

शाब्बास पोलिस दादा, अवघ्या ७२ तासांत लावला चोरीचा छडा! 

sakal_logo
By
संतोष मद्दीवार

अहेरी (जि. गडचिरोली) : एखाद्या ठिकाणी चोरी झाली, तर पोलिस येतात, पंचनामा करतात आणि गुन्हा दाखल करतात. मग त्यांची तपासाची चक्रे अनेक दिवस, कित्येकदा अनेक महिने फिरत राहतात. मात्र, अहेरी पोलिसांनी ट्रॅक्‍टरचोरी प्रकरणात कमालीच्या वेगाने कारवाई करीत अवघ्या ७२ तासांमध्ये चोरीचा छडा लावला. एवढेच नव्हे, तर राज्याची सीमा पार करून पसार झालेल्या चोरट्याला तेलंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्यातून हुडकून काढत अटक केली. 

प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली मार्गावरील श्री व्यंकटेश्‍वरा मोटर्स या ट्रॅक्‍टरच्या शोरूम समोर उभा असलेला चार लाख रुपये किमतीचा नवाकोरा ट्रॅक्‍टर एका चोराने शिताफीने लंपास केला. शोरूमचे मालक रमेश चुक्कावार यांनी यासंदर्भात अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी अतिशय जलदगतीने व गंभीरपणे या चोरीचा तपास सुरू केला. 

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, अपर पोलिस अधीक्षक अजय बन्सल, प्राणहिताचे अपर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे प्रभारी अधिकारी प्रवीण डांगे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक दडस पाटील, पोलिस हवालदार अलोने, नायक पोलिस शिपाई आलाम, पोलिस शिपाई सोमनपल्लीवार यांचा समावेश होता. त्यांनी वेगाने तपासचक्र फिरवल्यावर तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्याच्या रामाडगू तालुक्‍यातील रंगासाईमल्ली या गावात चोरीचा ट्रॅक्‍टर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तिथे जाऊन ट्रॅक्‍टर जप्त केला. 

ट्रॅक्‍टर तर मिळाला, पण आरोपी अद्याप हाती आला नव्हता. त्यामुळे या पथकाने तपास सुरूच ठेवत अखेर चोरालाही शोधून काढले. व्यंकटेश लक्ष्मीनारायण सांबारी (वय 29) असे या चोराचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्यातील सुलतानाबाद येथील रहिवासी आहे. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपी व्यंकटेश सांबारीचे गाव गाठत त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अहेरी -आलापल्ली मार्गावर या आधीही मोठ्या वाहनांची तसेच इतर सामानांची चोरी झाली आहे. परंतु आता नवीन गाड्या चोरण्याइतपत चोरट्यांची हिंमत वाढली आहे. ही परिसरासाठी धोक्‍याची घंटा आहे. 

हेही वाचा - मला लाच मागितली... आता मी काय करू?, तक्रार कुठे करू? सांगा 
 

कोरोनामुळे आधीच उद्योग क्षेत्रात प्रचंड मंदी असताना एवढा महागडा ट्रॅक्‍टर चोरीला गेल्याने शोरूम मालक चुक्‍कावार यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखविल्याने त्यांच्यावरील हे संकट टळले आहे. येथील प्राणहिता नदीवर नुकत्याच निर्माण झालेल्या पुलामुळे या मार्गाने परराज्यात वाहतूक करणे सोपे झाले असून त्यामुळेच चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नागरिकांत वर्तविली आहे. तसेच यामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. नागरिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन' 
 

विश्‍वास वृद्धिंगत... 

अधुनमधून चोरी होत असल्याने व अलीकडे चोरीचे प्रमाण वाढल्याने येथील बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु पोलिसांनी या ट्रॅक्‍टरचोरी प्रकरणी परराज्यापर्यंत पाठपुरावा करीत तत्परतेने चोरास पकडल्यामुळे नागरिकांमध्ये पोलिस विभागावरचा विश्‍वास वृद्धिंगत झाला आहे. तसेच नवनिर्मित पुलामुळे चोरी करून परराज्यात पळण्याचा प्रयत्न होत असल्याने या पुलावर पाळत ठेवावी व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 
 

loading image