भरदुपारी घरात घुसला पोलिस निरीक्षक अन् यवकाला मार मार मारलं, चंद्रपुरात दंडुकेशाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या नागभीड तालुक्‍यातील नांदेड येथील एका युवकाला त्याच्या घरी जाऊन पोलिस उपनिरीक्षक आकाश साखरे आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आईवडीलांसमोर बेदम मारहाण केली.

तळोधी बाळापूर (जि. चंद्रपूर) : अन्यायाविरूध्द सामान्य माणूस पोलिसांकडे जातो. मात्र पोलिसच विनाकारण अन्याय्य वागत असतील तर सामान्यांनी जावे कोणाकडे? असा प्रश्न पडावा, अशी घटना नुकतीच घडली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या नागभीड तालुक्‍यातील नांदेड येथील एका युवकाला त्याच्या घरी जाऊन पोलिस उपनिरीक्षक आकाश साखरे आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आईवडीलांसमोर बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीच तक्रार नसताना विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी युवकाच्या आईवडिलांनी केली आहे.
तळोधी बा. पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आकाश साखरे व पोलिस हवालदार भास्कर पिसे, सतीश नेवारे हे तिघे 16 मे रोजी दुपारच्या सुमारास नांदेड येथील परमेश्वर डोमाजी मडावी या युवकाच्या घरी गेले. त्यानंतर त्याला झोपेतून उठवून आईवडिलांसमोर मारहाण करणे सुरू केले. मुलाने काय गुन्हा केला, अशी विचारणा आईवडील करीत असताना पोलिसांनी काहीच न सांगता लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. यात परमेश्‍वर  गंभीर जखमी झाला. यानंतर या पोलिसांनी गावातील अक्षय बांबोळे, भूषण केवळराम खोब्रागडे, विकास राजिराम रामटेके या युवकांनासुद्धा शिवीगाळ करीत मारहाण केली.

सविस्तर वाचा - कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा
जखमी अवस्थेत परमेश्‍वरला तळोधीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोणतीच तक्रार नसताना विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी परमेश्‍वरच्या आईवडीलांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधक्षक्षकांना निवेदनातून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police beated a boy in his home