
पोलिसांनी क्रिकेट सट्ट्यात झालेल्या ऑनलाइन व्यवहाराची माहिती मोबाईल क्रमांक देत मागितली आहे. त्यामुळे पोलिस मुख्य बुकींपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचले आहेत. मात्र, मोठे बुकी अद्यापही मोकळेच आहेत. पोलिसांनी क्रिकेट सट्ट्यात झालेल्या ऑनलाइन व्यवहाराची माहिती मोबाईल क्रमांक देत मागितली आहे. त्यामुळे पोलिस मुख्य बुकींपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा - अमरावती जिल्हा दुष्काळाच्या श्रेणीत; १,९६० गावांतील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी
सध्या ऑस्ट्रेलियात 'बिग बॅश लीग टी-ट्वेंटी' या लोकप्रिय असलेल्या क्रिकेटचे सामने सुरू आहेत. या सामन्यांवर यवतमाळातील 'बुकीं'कडून सट्टा स्वीकारणे सुरू असताना पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, सायबर सेलने नितीन उर्फ राम शर्मा (वय 32) याच्या घरी छापा टाकला होता. चार संशयितांना ताब्यात घेऊन सहा लाख 57 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या ठिकाणाहून नीलेश नान्ने (वय 25), दुर्गेशसिंग राणा (वय 24, दोघेही रा. आठवडीबाजार, यवतमाळ), विक्रम गहरवाल (वय 32, रा. साई मंदिरजवळ, यवतमाळ) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - तुली इंपेरियलवर छापा : अंगविक्षेपासह मद्यधुंद युवक-...
चौघेही एलईडी टीव्हीवर बिग बॅश लीग 'टी-ट्वेंटी'चा सामना सुरू असताना हॉटलाइन व मोबाईल फोनद्वारे क्रिकेट सट्ट्यांवर आकडे घेताना, लॅपटॉप व कागदावर क्रिकेट सट्ट्याची नोंद करताना आढळून आले होते. एक हॉट-लाइन व 16 मोबाईल कनेक्शन असलेली (पोपट लाइन डब्बा), एक लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही, 25 मोबाईल, असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला होता. पोपट लाइन डब्ब्यात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आहेत. तीन लाखांची रोकड मिळाली असली तरी ऑनलाइन झालेला व्यवहार कोट्यवधींच्या घरात असल्याची शंका पोलिसांना आहे. जाळ्यात अडकलेल्यांचा केवळ नावापुरताच वापर करून घेतला जातो. बडे मासे अद्यापही मोकळेच आहे. विविध कंपन्यांकडून ऑनलाइन व्यवहाराचा डाटा मागून म्होरक्यापर्यंत पोहोचण्याची पोलिसांची रणनीती आहे. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे क्रिकेट सट्ट्यातील बुकींत एकच खळबळ उडालेली आहे.
हेही वाचा - कुठे शेकोटीचा तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा; वातावरण झाले गरम
ऑनलाइन सट्टा खेळताना मोबाईल क्रमांकावरून फोन केला जातो. क्रिकेट सट्ट्यात झालेल्या व्यवहाराचे ऑनलाइन डिटेल पोलिस प्रशासनाने संबंधित कंपन्यांकडे मागितले आहे. ती माहिती यायला अजून काही काळ लागणार आहे. त्यानंतरच अधिक बोलता येईल.
-डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ.